मध्य प्रदेशातील मय्यर किल्ल्यावरील राजघराण्याच्या पुरातन मूर्तीची चोरी करून त्याची लोणावळ्यात विक्री करताना चौघांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. लोणावळा शहर आणि मध्य प्रदेश पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली. त्यांच्याकडून पुरातन सात मूर्ती जप्त केल्या आहेत.
सलमान उर्फ शैलेश चौहान (वय १९), नीरज रामाश्रय शुक्ला (वय २८), पवन शुक्ला (वय २८), राजेश शुक्ला (वय ४०, रा. सर्वजण- मय्यर,  जिल्हा- सतना मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तिलकसिंग रामसिंग यांनी मय्यर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील सतना तालुक्यात मय्यर किल्ला आहे. या किल्ल्यात कारागीर म्हणून काम करणाऱ्या चौहान व नीरज यांनी पुरातन मूर्तीची चोरी केली. या मूर्ती विकण्यासाठी हे आरोपी त्यांचे मित्र राजेश व पवन यांच्याकडे लोणावळा येथे आले होते. याची माहिती पोलीस निरीक्षक विष्णु पवार यांना मिळाली. त्यानुसार मूर्ती खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांची सर्व माहिती काढली. रविवारी सायंकाळी लोणावळा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेख, तावरे, ठोसर आणि मध्य प्रदेश पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांच्याकडून सात पुरातन मूर्ती जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींना मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.