पिंपरी-चिंचवडमध्ये ४६ ठिकाणी तात्पुरती भाजीपाला विक्री केंद्र सुरू

पिंपरी : भाजीपाला तसेच फळे खरेदीसाठी एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहराच्या विविध भागात असलेली प्रशस्त मैदाने आणि मोकळ्या जागा पिंपरी पालिकेच्या वतीने भाजीमंडईसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरभरात विविध ४६ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

टाळेबंदी असतानाही शहरातील बाजार तथा मंडईत नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होताना दिसते. पिंपरीतील मुख्य भाजीमंडईत दोन वेळा नागरिकांची गर्दी उसळण्याचे प्रकार घडले. बुधवारी सकाळी तेथील गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी  सौम्य लाठीमार केला. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने मोकळ्या मैदानांमध्ये भाजीमंडई सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शहरातील चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, चिखली, भोसरी, वाकड, थेरगाव येथील भाजी मंडई पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने प्रत्येक प्रभागात किमान एक तात्पुरत्या स्वरूपातील भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले जाणार आहे. विविध ४६ ठिकाणी अशाप्रकारे केंद्र असतील. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ही केंद्र खुली राहणार आहेत. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येकाला गर्दी टाळून सुरक्षित अंतर ठेवावे लागणार आहे. या ठिकाणी प्रतीक्षालयाची उभारणी करण्यात येणार आहे. पालिकेनेही आवश्यक इतर खबरदारी घेतली आहे.

भाजीपाला विक्री केंद्र

* पीडब्ल्यूडी मैदान, सांगवी

* गावजत्रा मैदान, भोसरी

* महापौर निवासस्थान मैदान, प्राधिकरण

* डी मार्ट शेजारील भूखंड, रावेत

* अण्णासाहेब मगर स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी

* शनी मंदिरासमोरील मैदान, पूर्णानगर, चिखली

* सर्वेक्षम क्रमांक ६२८, वनदेवनगर, थेरगाव

शहरभरातील भाजीमंडई पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रभागातील मोकळ्या जागेत तात्पुरत्या स्वरूपातील फळे व भाजीपाला केंद्र सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवायचे असून शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करायचे आहे.

– श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी पालिका