सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, तर नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयानुसार कोल्हापूर महापालिकेतील २० नगरसेवकांना आपले पद गमवावे लागले होते. त्यानंतर आता पुणे महापालिकेतील ७ नगरसेवकांना देखील त्याच नियमाचा फटका बसला आहे. पुणे महापालिकेच्या ७ नगरसेवकांचे पद रद्द करण्याच्या अहवालावर आयुक्त सौरव राव यांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास स्वाक्षरी केली.

या विषयी सौरभ राव म्हणाले की, नगरसेवकपद रद्दचा अहवाल नगरविकास विभागाला पाठवण्यात आला आहे. त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

सत्ताधारी भाजपाला याचा मोठा फटका बसला आहे. त्यांच्या ५ नगरसेवकांचे तर २ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे. त्यामध्ये किरण जठार, आरती कोंढरे, फरजना शेख, कविता वैरागे, वर्षा साठे हे सर्व भाजपा, बाळा धनकवडे, रूकसाना इनामदार राष्ट्रवादी अशी या नगरसेवकांची नावे आहेत.

पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपाच्या नगरसेवकांची ९८ असलेली संख्या आता ९३ झाली आहे. तर राष्ट्रवादीचे ४१ नगरसेवक होते. आता त्यांचे २ नगरसेवक कमी झाल्याने त्यांची संख्या ३९ झाली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने याबाबत कोणत्याच न्यायालयात अपील करता येणार नाही. त्यामुळे लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.