गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला आता काही तासच शिल्लक राहिले असून त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे. यंदाचीही मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी ८ हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. तसेच मागील वर्षीपेक्षा यंदा लवकर मिरवणूक मार्गी लावण्यावर विशेष भर असणार आहे, अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस आयुक्त व्यंकटेशम म्हणाले, “पुणे शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच विविध संघटनेचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी वाहतूक नियमनाचे काम पाहणार आहेत. मानाच्या गणपतींची टिळक चौकातून सकाळी १० वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तर यंदा मानाच्या गणपतीमध्ये ३ ढोल ताशा पथक आणि इतर मंडळाकरीता २ पथकांचीच परवानगी देण्यात आली आहे. या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध ६०० गणेश मंडळे विसर्जनासाठी लक्ष्मी, कुमठेकर, टिळक रस्त्यांवर रांगेत असतात. या मिरवणुकीत सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व संशयास्पद हालचालींवर लक्ष असणार आहेच. पण पोलिसांकडे असणार्‍या ड्रोन कॅमेऱ्यांद्वारेही मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. मात्र, चित्रीकरणासाठी खासगी ड्रोनला परवानगी देण्यात आली नसल्याचे त्यांनी व्यंकटेशम यांनी यावेळी स्पष्ट केले.

शहरातील मध्य भागात वाहने आणता येणार नाही. या वाहनांसाठी रिंगरोडद्वारे मार्ग तयार करण्यात आला आहे. यामुळे मिरवणुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच शहरातील मिरवणूक पाहण्यास जिल्ह्याच्या आसपासच्या भागातून भावीक येत असतात, अशा भाविकांना कोणत्या परिसरात वाहतूक कोंडी आहे किंवा वाहतूक वळवण्यात आली आहे याची माहिती पुणे ट्राफिक वॉचवर मिळणार आहे.