तब्बल १.६४ टन कार्बनचे उत्सर्जन; वीज, पेट्रोलियम उत्पादनांच्या वाढत्या वापराचा परिणाम
पुणे : शहरातील विविध प्रकारच्या वाढत्या वीज वापरामुळे कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. कार्बन उत्सर्जनाचे दरडोई वार्षिक प्रमाण १.६४ टन असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. पाच वर्षांपर्यंत हे प्रमाण दरडोई १.४६ टन होते. व्यावसायिक तसेच निवासी क्षेत्रात सुरू असलेला वाढता वीजवापर तसेच पेट्रोलियम उत्पादनांच्या वाढत्या वापरामुळे हे प्रमाण वाढले आहे.
महापलिकेच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालात ऊर्जा विषयाची माहिती देण्यात आली असून शहरातील विविध वायूंच्या उत्सर्जनाचा आढावा घेण्यात आला आहे. कार्बन फुटप्रिंटसह शहरातील विजेच्या मागणीची सद्य:स्थिती, रहिवासी, व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रातील ऊर्जेचा वापर, महापालिकेच्या सेवा-सुविधांसाठी खर्च होणारी ऊर्जा अशा काही घटकांचा ऊहापोह या अहवालात करण्यात आला आहे. त्यामध्ये कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण अलीकडच्या काही वर्षांत वाढले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर शाश्वत विकास करताना पर्यावरणपूरक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार असल्याचे समोर आले आहे.
वाढते शहरीकरण, बदलती जीवनशैली, औद्योगिकीकरण आणि विद्युत उपकरणांचा वाढता वापर यामुळे विजेची मागणी सातत्याने वाढत आहे. वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेला कोळसा, तेल, नैसर्गिक वायू या पारंपरिक इंधनाचे साठे कमी होत आहेत. या पाश्र्वभूमीवर कार्बनचे वाढलेले उत्सर्जन हा शहरासाठी धोक्याचा इशारा ठरला आहे.
वीजनिर्मितीसीठी कोळशाच्या वापराबरोबरच एलपीजी, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, सीएनजी-पीएनजी अशी इंधने वापरली जात आहेत. त्यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होत आहे. २०१६-१७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार गेल्या पाच वर्षांत ६० लाख ११ हजार ४७४ टन वायू उत्सर्जित झाला आहे.
उपाययोजनांचे काय होणार?
ऊर्जेच्या वापराची माहिती देताना आणि वातावरणात होणाऱ्या वायू उत्सर्जनाकडे लक्ष वेधताना पर्यावरण अहवालात काही उपाययोजनाही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांची अंमलबजावणी होणार का, हा मुख्य प्रश्न आहे. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर भर देण्याची उपाययोजना सुचवण्यात आली असली तरी या ऊर्जा स्त्रोत वापरासाठी कोणतीही ठोस कृती प्रशासनाकडून झालेले नाही.