पुण्यातील मंचर येथे २०० फूट बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची अखेर सुटका करण्यात आली आहे. तब्बल १५ तासांनी मुलाला बोअरवेलच्या बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. मुलाला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. सकाळी एनडीआरएफचं पथक मुलापर्यंत पोहोचलं होतं. पण कमरेचा भाग अडकला असल्या कारणाने त्याला बाहेर काढण्यात अडचण येत होती. पण अखेर मुलगा सुखरुप बाहेर पडला आहे.

रवी पंडित असं या मुलाचं नाव आहे. खेळता खेळता तो बोअरवेलमध्ये पडला होता. या परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरु असून अनेक कामगार या कामात सहभागी आहेत. रवीचे आई-वडिलही बांधकाम मजूर असल्याने तोही आई-वडिलांसोबत याठिकाणी होता. बोअरवेलवर कोणतेही झाकण नसल्याने खेळता-खेळता ६ वर्षांचा रवी थेट बोअरवेलमध्ये पडला होता. बुधवारी सायंकाळी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती.

सुरुवातीला तो केवळ १० फुटांवर अडकला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. माहिती मिळाल्यानंतर मंचर पोलीस घटनास्थळी हजर झाले होते. नंतर एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. यानंतर त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु झाले होते. अंधार पडल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या. पण अखेर १५ तासांनी रवीला बोअरवेलच्या बाहेर काढण्यात आलं आहे. संबंधित घटनेत जे कोणी दोषी असतील किंवा आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक खराडे यांनी दिली आहे.