‘रॉ’चे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांचे मत
काश्मीरमधील जनतेला अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आत्मविश्वास लाभला होता. पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवून संबंध सुधारण्यात येतील आणि काश्मीर भारतामध्येच राहील, हा विश्वास दिल्यामुळे वाजपेयी यांच्यावर काश्मीरमधील जनतेचे प्रेम होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाजपेयी यांचेच धोरण पुढे घेऊन जातील अशी अपेक्षा होती. मात्र, पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवून काश्मीरवासीयांना जिंकून घेण्यामध्ये मोदी यांना अपयश आले. संवादी नसण्याची चूक हे दुर्दैव आहे, असे मत भारतीय गुप्तचर संघटनेचे (रॉ) माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी रविवारी व्यक्त केले.
काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानतर्फे ‘काश्मीर आणि पाकिस्तान’ या विषयावर दुलत यांचे व्याख्यान झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनंत गाडगीळ आणि विश्वस्त डॉ. महेश तुळपुळे या वेळी उपस्थित होते.
दुलत म्हणाले, दहशतवादाला उत्तेजन देणाऱ्या पाकिस्तानला या दहशतवादानेच पोखरले आहे. लोकशाही संरचना मुळापासूनच हलू लागली आहे. लष्कराचे अधिक नियंत्रण असून देश राजकीयदृष्टय़ा अस्थिर झाला आहे. ऑगस्टमध्ये तेथे निवडणुका झाल्यानंतर परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. पाकिस्तान चर्चेसाठी उत्सुक असूनही मोदी यांची संवाद साधण्याची इच्छा दिसून येत नाही. दोस्ती कायम ठेवण्यासाठी संवादाची गरज ध्यानात घेतली पाहिजे.
काश्मीरमधील शांतता संपुष्टात येत असून तेथील मुलीदेखील दगड घेऊन रस्त्यावर उतरू लागल्या आहेत, याकडे लक्ष वेधून दुलत म्हणाले, दक्षिण काश्मीरमध्ये युवकांची वाटचाल दहशतवादी होण्याकडे सुरू झाली आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) या दोन प्रादेशिक पक्षांमुळे राज्याचे नुकसान होत आहे. दिल्लीच्या सत्तेशी जुळवून घेण्यामध्ये काश्मीरमधील राजकारण धन्यता मानते. त्यामुळेच सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी पीडीपीला भाजपशी युती करणे भाग पडले.
अन्य प्रादेशिक पक्षांप्रमाणे आपणही केंद्र सरकारकडून अधिक दान पदरात पाडून घेऊ ही पीडीपीची अपेक्षा फोल ठरली. पण, असे असले तरी काश्मीर भारतातच राहील. काश्मिरींना घर, न्याय, सन्मानाची वागणूक आणि आपलेपणाची भावना हवी आहे. या त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होत नसल्याने ते आझादीची भाषा करत आहेत. २०१४ नंतर पाकिस्तानशी चर्चा पूर्णपणे थांबली आहे. ती सुरू व्हावी अशी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचीही अपेक्षा आहे. फुटीरवादी म्हटली जाणारी हुरियतही आता मुख्य प्रवाहात येऊ लागली आहे. देशप्रेमी आणि देशद्रोही यावरही सातत्याने चर्चा होते. मुस्लिमांना देशद्रोही म्हटले जाते.
पण भारतातील मुस्लिम अधिक उदारमतवादी आहेत. त्यामुळे अशी चर्चा थांबवायला हवी. गाडगीळ यांनी प्रास्ताविकामध्ये प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. तुळपुळे यांनी आभार मानले.