‘महाविद्यालयाच्या प्रशासनाने किंवा संस्थेने मुरुड येथील अपघाताच्या घटनेची माहिती दिली नाही,’ असा आरोप पालकांनी केला. संतप्त झालेल्या पालकांनी या वेळी महापौरांना घेराव घातला. तणावाची स्थिती लक्षात घेता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्यामुळे आझम कॅम्पसच्या परिसराला यावेळी छावणीचे स्वरूप आले होते.
अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी महाविद्यालयाच्या आवारात धाव घेतली. परिसरामध्ये पालकांची गर्दी झाली होती. मात्र संस्था आणि महाविद्यालयाकडून उत्तरे न मिळाल्यामुळे पालक संतप्त झाले. ‘महाविद्यालयाकडून झालेल्या अपघाताची माहिती मिळाली नाही. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्या पाहून आम्ही महाविद्यालयात आलो,’ अशी तक्रार पालकांकडून  करण्यात येत होती. ‘ही सहल विद्यार्थ्यांवर बंधनकारक करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली नव्हती,’ असे आरोप या वेळी पालकांनी केले.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी महाविद्यालयाला भेट दिली. त्यावेळी संतप्त पालकांनी त्यांच्या मोटारीला घेराव घातला. पालकांची आणि विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची गर्दी वाढू लागल्यामुळे महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. त्यामुळे पालकांच्या संतापात भर पडली. महाविद्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. रात्री उशिरापर्यंत महाविद्यालयामध्ये पालकांची गर्दी होती. तेरा विद्यार्थ्यांचे मृतदेह रात्री उशिरा घटनास्थळावरून रवाना झाले.
‘मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,’ असे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी पालकांना सांगितले. कांबळे यांनी महाविद्यालयाच्या आवारात

जमलेल्या पालकांचे सांत्वन केले.
अपघाताची चौकशी होईल
‘शिक्षणसंस्थांकडून जेव्हा अशा सहली काढल्या जातात त्यामध्ये सहभागी होण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांचे संमतीपत्र आवश्यक असते. महाविद्यालयाने सुरक्षेची काळजी घेतली होती का, नियम पाळले होते का याबाबत चौकशी केली जाईल,’ असे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक विजय नारखेडे यांनी सांगितले.
पालकांना शोक अनावर..
राफिया अन्सारी मुमताज, शाफिया अन्सारी मुमताज या जुळ्या बहिणींचा मुरुड येथील अपघातात मृत्यू झाला. ‘माझ्या दोन्ही मुली मी गमावल्या आहेत. या घटनेला संस्था कारणीभूत आहे,’ असा आरोप या मुलींचे वडील मुनीर अन्सारी यांनी केला. अपघाताची माहिती मिळाताच इफ्तिकार आब्बास अली शेख या विद्यार्थ्यांचे वडील आणि बहीण महाविद्यालयाच्या आवारात पोहोचले. मृत्य विद्यार्थ्यांमध्ये इफ्तिकारचे नाव पाहून त्या धक्क्य़ाने दोघांचीही काही काळ शुद्ध हरपली.
गिरीष बापट घटनास्थळी
पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी मुरुड येथे घटनास्थळी भेट दिली. उपचार सुरू असलेल्या विद्यार्थ्यांची आणि मदतकार्याची माहिती बापट यांनी घेतली. रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनीही घटनास्थळी जाऊन अपघाताची माहिती घेतली.
धोकादायक ठिकाणी शाळांना सहलबंदी
– शालेय शिक्षण विभागीय उपसंचालक कार्यालयाचे पत्रक
मुरुड येथे झालेल्या अपघाताच्या पाश्र्वभूमीवर ‘धोक्याच्या ठिकाणी शालेय सहली नेण्यास बंदी घालणारे,’ पत्र शालेय शिक्षण विभागाच्या पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयाने सोमवारी काढले आहे.
मुरुड येथील अपघाताच्या घटनेने पुणे सोमवारी हादरले. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर शालेय अभ्यास सहलींवरही बंधने आणणारे पत्र विभागीय उपसंचालकांनी काढले आहे. ‘धोक्याच्या ठिकाणी शालेय सहली नेऊ नयेत, ’ असे पत्र विभागीय उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी काढले आहे. सहलींदरम्यान काय काळजी घ्यावी, कोणत्या ठिकाणी सहली न्याव्यात, आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, शिक्षक संख्या किती असावी याबाबत मार्गदर्शक सूचना शाळांना देण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.