भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे मान्सूनच्या पावसाचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जाहीर झाला असून, त्यानुसार शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या जुलै व ऑगस्ट महिन्यांमध्ये समाधानकारक पाऊस राहणार आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या १०१ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण पावसाळय़ात (जून ते सप्टेंबर) प्राथमिक अंदाजप्रमाणेच ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाळय़ात ‘एल-निनो’चा अडथळा राहणार नाही.
हवामान विभागातर्फे २६ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील अंदाज जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार या पावसाळ्यात देशात ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला. त्यानुसार देशभरात ९८ टक्के पावसाचाच अंदाज कायम ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी जुलै व ऑगस्ट महिन्यांच्या पावसाचाही अंदाज देण्यात आला. जुलैमध्ये १०१ टक्के, तर ऑगस्टमध्ये ९६ टक्के पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यात ९ टक्क्य़ांचा फरक पडू शकतो. याचबरोबर देशाच्या विविध भागात किती पाऊस पडेल हेही जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्राचा समावेश असलेल्या मध्य भारतात ९८ टक्के, वायव्य भारतात ९४ टक्के, दक्षिण भारतात १०३ टक्के, तर ईशान्य भारतात ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
या पावसाळय़ात ‘एल-निनो सदर्न ऑस्सिलेशन’ या घटकाची स्थिती सामान्य राहणार आहे. त्यामुळे पावसाळय़ात अडथळा येण्याची शक्यता अतिशय कमी आहे. याउलट पावसाच्या दृष्टीने पूरक ठरणारा ‘ला-निना’ हा घटक काही प्रमाणात सक्रिय राहण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2013 रोजी प्रकाशित
जुलै-ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस! – दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जाहीर; जुलै १०१ टक्के, तर ऑगस्ट ९६ टक्के
जुलै महिन्यात सरासरीच्या १०१ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.

First published on: 15-06-2013 at 02:44 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to weather forecast rain in july will be 101 august