तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) दहावी, बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांची, तसेच थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया येत्या ११ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, १२ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पर्याय निवडता येणार असल्याची माहिती डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली.

दहावीनंतर अभियांत्रिकी, पदविका अभ्यासक्रमासाठी, तर बारावीनंतर औषधनिर्माणशास्त्र पदविका, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी अशा अभ्यासक्रमांची आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया डीटीईकडून सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियांसाठी ५ डिसेंबरपर्यत विद्यार्थ्यांना नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी करता येणार आहे. डीटीईच्या वेळापत्रकानुसार अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागा ११ डिसेंबर रोजी जाहीर होतील. त्यानंतर १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत लॉगइनमधून महाविद्यालयांचे पर्याय निवडावे लागतील. त्यानंतर महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांंना १७ आणि १८ डिसेंबर या कालावधीत महाविद्यालयाची स्वीकृती प्रकिया पूर्ण करायची आहे. या प्रक्रियेनंतर १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन कागदपत्र पडताळणी करून, शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेशाची दुसरी फेरी २० डिसेंबरपासून सुरू होईल. प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती डीटीईच्या संके तस्थळावर उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी-पालकांच्या सुविधेसाठी ८६९८७४३२५६ आणि ८६९८७५८२३७ हे हेल्पलाइन क्रमांक देण्यात आले आहेत.