पुण्यात ऊस तोड मजुरांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंत दादा शुगर इन्स्टिटयूटमध्ये बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला भाजपचे नेते सुरेश धस यांना येता येणार नाही, असे सांगण्यात आले. त्या निर्णयामुळे धस आक्रमक झाले. त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन सुरु केले. या आंदोलनानंतर त्यांना बैठकीसाठी आत बोलवण्यात आले. “ज्यांनी मला बैठकीसाठी येऊ दिले नाही. तसेच आमच्या जिल्ह्यातील काही लोक आतमध्ये आहेत. त्यांना जाऊन विचारा” अशी भूमिका मांडत भाजपचे नेते सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मंत्री जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या काही तास अगोदर भाजपचे नेते सुरेश धस यांना फोन करून सांगितले जाते की, “तुम्हाला बैठकीसाठी उपस्थित राहता येणार नाही. त्यानंतर धस आक्रमक होत, वसंत दादा शुगर इन्स्टिटय़ुटच्या प्रवेशद्वारा कार्यकर्त्यांसह जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.” वंचित संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलवले नाही. याच्या निषेधार्थ बाहेर आंदोलन सुरू आहे. अनेक गाड्या रोखल्या आहेत.

यावेळी सुरेश धस म्हणाले की, “ऊस तोड मजुराच्या प्रश्नावर आजवर अनेक वेळा बैठकीला उपस्थित राहिला आहे. मात्र यंदा का येऊ दिले नाही, हे समजण्यास मार्ग नाही. राज्यात 13 लाख ऊस तोड कामगार आहेत. त्या सर्वांचे प्रश्न मांडण्यासाठी आलो होतो. मात्र काही तास अगोदर सांगितले जाते की, तुम्हाला बैठकीला येत येणार नाही. यातून एकच स्पष्ट होते.आतमध्ये केवळ म, म म्हणणारेच पाहिजे आहेत. असेच लोक आतमध्ये घेतले आहेत” अशा शब्दात बैठकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तसेच ते पुढे म्हणाले की, “बैठकीला न बोलवून दडपशाही आणि मुस्कटदाबीचा प्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच आमच्या जिल्ह्यातील काही लोक आतमध्ये आहेत. या बैठकीनंतर जे आतमध्ये आहेत. त्यांना याबद्दल जाब विचारावा” असे त्यांनी सांगितले. आज बैठकीत आवाज उठवू दिला नाही. पण मी उसाच्या फडात जाऊन, कामगारांसोबत संवाद साधून आवाज उठविण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.