पुणे-बंगळुरू महामार्गवर आनेवाडी (ता. जावळी) येथील कुलभूषण जाधव यांच्यावर अंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्याने आनेवाडी ग्रामस्थानी साखर वाटून व फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.

हेरगिरी प्रकरणी पाकच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले  भारतीय नौदलाचे अधिकारी व सातारा जिल्ह्यातील आनेवाडी गावचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी आज अंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावनी होणार असल्याने, सकाळपासून ग्रामस्थांना निकालाची उत्सुकता लागली होती. अखेर सायंकाळी ६.३० वाजता याबाबत न्यायालयाने त्यांना पाकिस्तानने सुनावलेल्या शिक्षेस स्थगिती दिल्याच्या निकाल दिला. या निकालानंतर आनेवाडी ग्रामस्थांनी आनेवाडीफाट्यावर फटाके फोडून व साखर वाटप करत आनंद साजरा केला. यावेळी ग्रामस्थांनी ” भारत माता की जय ” पाकिस्तान मुर्दाबदच्या घोषणा देखील दिल्या. आनेवाडी येथे कुलभूषण जाधव यांची शेती व घर आहे. यामुळे त्यांचे गावात येणे जाणे होते. गावातील कार्यक्रमात ते भाग घेत सातारा जिल्हापरिषद शाळेतील मुलांना ते मार्गदर्शन करत व खाऊ वाटप करत. त्यांच्या कामगिरीचा ग्रामस्थांना अभिमान आहे त्यामुळे कुलभूषण यांच्या शिक्षेस स्थगिती मिळताच ग्रामस्थांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भुईंज पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.