कचरा साठवणूक न करता कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासंबंधी आजपर्यंत दिलेली कोणतीही आश्वासने महापालिकेने न पाळल्यामुळे यापुढे उरुळी, फुरसुंगी येथे कचरा टाकू दिला देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. कचरा टाकू न देण्याचे हे आंदोलन ८ ऑगस्टपासून सुरू केले जाईल, अशी माहिती आमदार विजय शिवतारे यांनी शुक्रवारी दिली. महापालिका आयुक्तांनाही तसे पत्र देण्यात आले आहे.
उरुळी येथे गेली बावीस वर्षे कचरा टाकला जात असून आतापर्यंत ऐंशी लाख टन कचरा येथे साठवण्यात आला आहे. या कचऱ्यातून घातक द्रव्य तसेच वायू बाहेर पडत आहेत. तसेच संपूर्ण परिसराला दरुगधीचाही त्रास होत आहे. कचरा डेपोला आग लागण्याचेही प्रकार घडत आहेत. अशा अनेक समस्यांबाबत महापालिकेकडे तसेच राज्य शासनाकडेही आम्ही दाद मागितली. प्रत्येक वेळी कचरा साठवून न ठेवता त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन दिले गेले. मात्र ते पाळण्यात आलेले नाही. त्यामुळे आता कचरा टाकू नका असे आंदोलन केले जाणार असल्याचे आमदार शिवतारे आणि शंकर हरपळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम महापालिकेने हंजर आणि रोकेम या दोन कंपन्यांना दिले असले, तरी या कंपन्यांचे काम बंद असल्यासारखी परिस्थिती आहे. हंजर कंपनीच्या प्रकल्पात फक्त शंभर टन कचऱ्यावर रोज प्रक्रिया केली जात आहे आणि उर्वरित सुमारे सोळाशे टन कचरा रोज साठवला जात आहे. यापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या वेळी अशा प्रकारे कचऱ्याचे डंपिंग न करता त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र तेही पाळण्यात आलेले नाही, असेही शिवतारे म्हणाले.
उरुळीच्या कचरा डेपोमध्ये यापुढे कचरा टाकू देणार नाही. जेवढय़ा कचऱ्यावर तेथील प्रकल्पामध्ये प्रक्रिया होणार असेल, तेवढाच कचरा टाकू दिला जाईल. सध्या शंभर टन कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्यामुळे तेवढा कचरा तेथे आणावा, असेही निवेदन ग्रामस्थांच्या वतीने महापालिकेला देण्यात आले आहे. कचरा डेपोच्या विरोधात ८ ऑगस्टपासून आंदोलन सुरू होईल. त्या दिवशी भेकराईनगर येथील जकातनाक्यापासून आंदोलक कचरा डेपोकडे जातील, असेही सांगण्यात आले.
कचरा डेपोसाठी अन्यत्र जागा बघितल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महापालिकेने तेथे कचरा टाकण्याचे काम सुरू करावे. त्या जागांवर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी लागणारा वेळ पाहता सध्या त्या जागांवर कचरा टाकण्याचे काम सुरू करता येईल, असे शिवतारे यांचे म्हणणे आहे.