अजित पवारांचा टोला
पुणे : कोथरूडची कामे व्हावीत म्हणून पाच वर्षांसाठी त्यांना निवडून दिले आहे. एक वर्ष होताच ते कोल्हापूरला परत जायची भाषा करत आहेत. कोल्हापूरलाच थांबायचे होते, तर पुण्यात आलातच कशाला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. भाजपचे एक नेते पुन्हा येईन म्हणतात, तर दुसरे नेते परत जाईन म्हणतात, अशी टिपणीही त्यांनी केली.
पुण्यातील एका कार्यक्रमात पाटील यांनी पुन्हा कोल्हापूरला जाणार असल्याचे वक्तव्य शुक्रवारी के ले होते. या वक्तव्यावरून करोनास्थितीचा आढावा बैठकीसाठी पुणे दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी पत्रकारांशी बोलताना पाटील यांच्यावर टीकाटिपणी के ली. ते म्हणाले, ‘सरकार नसल्याने पाटील अस्वस्थ झाले आहेत. परत जायला त्यांना पुण्यात कोणी बोलावले नव्हते.’
दरम्यान, भाजपचे आमदार संपर्कात असल्याबाबत ते म्हणाले, भाजपचे आमदार संपर्कात असल्याचे मी म्हटलेले नाही. कामे होत नसल्यास आमदार दुसरीकडे जातील, असे मी म्हटले आहे. येत्या तीनचार महिन्यांत काही गोष्टी घडू शकतात. भाजपचे काही कार्यकर्ते राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असून लवकरच त्यांचे आम्ही स्वागत करू.