|| चिन्मय पाटणकर

प्रचार तापलेला असूनही मद्यविक्रीत वाढ नाही

लोकसभा निवडणुकीचा शिगेला पोहोचत असलेला प्रचार.. अंगाची काहिली करणारा उन्हाचा कडाका.. असे ‘पूरक’ वातावरण असूनही शहरातील मद्यविक्री अद्याप थंडच आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यापासून मद्यविक्रीत विशेष वाढ झाली नसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

कोणत्याही निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी मद्य आणि जेवणाचे आमिष दाखवले जाते. त्यामुळे निवडणूक आली, प्रचार तेजीत आला, की मद्यविक्रीत वाढ होते हे दृढ समीकरण आहे. मात्र, ही लोकसभा निवडणूक अद्याप या समीकरणाला अपवाद ठरत असल्याचे दिसून येत आहे. मार्च अखेरीस आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर मद्यविक्रीमध्ये विशेष वाढ झालेली नसल्याची माहिती मद्य विक्रेता व्यावसायिकांकडून देण्यात आली.

‘लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असला, तरी त्याचा अद्याप मद्यविक्रीवर विशेष परिणाम झालेला नाही. गेल्यावर्षी याच काळात झालेल्या विक्रीच्या तुलनेत जेमतेम १० टक्के वाढ झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाला विक्रीची माहिती दैनंदिन द्यावी लागत असल्याने आकडेवारीवरून वाढ होत नसल्याचे दिसून येते,’ असे पुणे जिल्हा मद्यविक्रेता संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खांदवे यांनी स्पष्ट केले.

उत्पादन शुल्क विभागाची नजर

जेवण आणि मद्य देऊन मतदारांना आकर्षित करण्याचे प्रकार रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग नजर ठेवून आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मद्यविक्री २० टक्क्य़ांपेक्षा जास्त झाल्याचे आढळून आल्यास परमिट रूम आणि किरकोळ विक्रेत्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शहर आणि जिल्ह्य़ातील हॉटेल, ढाब्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

अखेरच्या टप्प्यात वाढ होण्याची शक्यता

सर्वसाधारणपणे विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी मद्यविक्री तेजीत असते. लोकसभा निवडणुकीमध्ये मद्यविक्री फार मोठय़ा प्रमाणात होत नाही. त्यामुळेच मद्यविक्रीत अद्याप विशेष वाढ झालेली नाही. मात्र, प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यताही व्यावसायिकांनी वर्तवली.