पिंपरी-चिंचवड शहराला रेड झोन मधून वगळण्यात आले असून उद्या (शुक्रवार) पासून शहरातील सर्व दुकाने खुली राहणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश राज्यशासनाने दिला होता. कंटेंमेंट झोन वगळून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही दुकाने खुली राहणार आहेत. तसे आदेशाचे पत्रक महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे . तर शहरातील पीएमपीएल सेवा देखील ५० टक्के प्रवाशांच्या क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे.

करोना विषाणूमुळे अवघ्या देशावर संकट आलं आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून टाळेबंदी लागू करण्यात आली असून चौथ्या टप्प्यात रेड आणि ग्रीन असे झोन करण्यात आले आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराला रेड झोन मधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील गेल्या दोन महिण्यापासून बंद असलेली सर्व दुकान शुक्रवारी खुली करण्यात येणार आहेत. मात्र, पी-१ आणि पी-२ नुसार रस्त्याच्या एका बाजूची दुकान सम तारखेला उघडी राहतील तर दुसऱ्या बाजूची दुकाने विषम तारखेला उघडी राहतील. त्यामुळे बाजार पेठेतील गर्दी टाळणे शक्य होईल. नागरी वसाहती, नागरी संकुलनातील दुकाने त्याच वेळेत सुरू राहणार असून ग्राहकांनी सोशल डिस्टसिंग पालन करणे बंधनकारक आहे. तस न केल्यास त्या ठिकाणची दुकान बंद करण्यात येणार आहेत.