अवकाळी पाऊस, अमेरिका, युरोप, जपानची खुली झालेली बाजारपेठ यांमुळे 13mango1आंब्याची गोडी सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर राहण्याचीच शक्यता आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षी बाजारपेठेत ७० टक्के आंबा कमी आल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या सातशे ते हजार रुपये डझन असे किरकोळ बाजारात रत्नागिरी हापूस आंब्याचे दर आहेत.
एप्रिल महिना म्हणजे आंब्याचा हंगाम. मात्र अर्धा एप्रिल संपला तरीही अद्यापही आंबा घरोघरी पोहोचलेला नाही. या वर्षी आवकच कमी झाल्यामुळे आंबे सामान्य माणसाच्या खिशाला परवडणार का असा प्रश्न आहे. रंग, वास, चव यांमुळे रत्नागिरी आणि देवगड हापूसला मागणी असते. या आंब्याचे दर हे साधारण सातशे ते हजार रुपये डझन असे आहेत. या वर्षी कर्नाटक हापूसही भाव खाऊन आहे. सध्या कर्नाटक हापूसचे दर हे साधारण चारशे ते पाचशे रुपये डझन असे आहेत. हापूस नाही तरी नीलम, रत्ना यांसारखे वाण किंवा उत्तरेकडील आंब्याचे काही वाण हे दरवर्षी थोडासा दिलासा देत असतात. मात्र, या वर्षी या वाणांचेही उत्पादन कमी झाले आहे. अक्षयतृतीयेसाठी बाजारपेठेत आंब्याची मोठी उलाढाल होते. मात्र, यंदा मागणीच्या २५ टक्केच आंबा प्रत्यक्ष बाजारात येत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. आंब्याचे भाव अद्यापही कमी झालेले नाहीत.
दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी ३० टक्केच आंबा स्थानिक बाजारपेठेत आला असल्याचे व्यापारी सांगतात. आंब्याला मोहोर येण्याच्या काळात आलेल्या अवकाळी पावसाने मोहोर गळून पडला. त्यामुळे मुळातच फळ कमी आले. त्यातच या वर्षी अमेरिका, युरोप आणि जपानमधील बाजारपेठ आंब्यासाठी खुली झाली. त्यामुळे मुळातच कमी असलेल्या पिकातील सर्वोत्तम दर्जाची फळे ही निर्यात होऊ लागली आहेत. साधारण १० टक्के आंबे निर्यात होत आहेत. आता वाढत्या मागणीमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरातील फळांचेही बाजारभाव वाढले आहेत. मोठय़ा उत्पादकांकडील आंबे निर्यात होत असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेचा भरवसा हा लहान शेतक ऱ्यांवर अधिक आहे. मात्र, कमी झालेले उत्पादन आणि पर्यटनामुळे स्थानिक बाजारपेठेत मिळणारे ग्राहक यांमुळे छोटय़ा शेतक ऱ्यांकडून पुणे किंवा मुंबईच्या बाजारपेठेत होणारा पुरवठाही कमी झाला असल्याचे निरीक्षणही व्यापाऱ्यांनी नोंदवले आहे.

‘‘या वर्षी जेवढी मागणी आहे, त्याच्या २५ ते ३० टक्केच आंबा येत आहे. २००७ मध्ये अशी परिस्थिती होती. सध्या अक्षयतृतीयेमुळे खूप मागणी आहे. मात्र, त्या तुलनेत पुरवठा अगदीच कमी आहे. अक्षयतृतीयेनंतर मागणी कमी झाल्यामुळे भाव थोडे कमी होतील. मात्र, या वर्षी आंब्याचे भाव हे साधारण १० ते २० टक्के चढेच राहतील.’’
– नितीन कुंजीर, पुणे (रत्नागिरी हापूस आंब्याचे घाऊक विक्रेते)

‘‘दरवर्षी बाजारपेठेत जेवढी फळे या हंगामात येतात, त्याच्या दहा टक्केच फळे येत आहेत. पुणे किंवा मुंबईच्या तुलनेत कोकणात भाव कमी आहेत. मात्र, तरीही ते दरवर्षीपेक्षा जास्तच आहे. चांगला आंबा निर्यात होतो आहे. मात्र, त्याचे प्रमाणही खूप कमी आहे. बदलत्या हवामानात अजून दोन आठवडय़ांनी फळांची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर दर थोडेसे कमी होऊ शकतील.’’
अतुल शेठ, खेड (रत्नागिरी हापूस आंब्याचे घाऊक विक्रेते)