मदतीची हाक देताना संकोच; अनेकांवर मिळेल ते काम करण्याची वेळ

पिंपरी : गेल्या वर्षभरात करोनामुळे निर्माण झालेल्या अस्थिर, बेभरवशाच्या परिस्थितीत कलावंतांचे जगणे अवघड झाले असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उत्पन्नाचे मार्ग बंद  झाले असून साठवलेले पैसे संपुष्टात आले आहेत. इतर कोणाकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता कमी आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा फटका सर्वानाच बसला, कलाक्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. वर्षभरापासून बहुतांश कलावंत आर्थिक विवंचनेत आहेत. करोनामुळे लागू केलेले निर्बंध, टाळेबंदीमुळे सगळं काही ठप्प झाले. कलावंतांना मिळणारी कामे मिळेनाशी झाली. पैसे येण्याचे मार्ग बंद झाले. दररोजच्या गरजा, औषधपाणी, मुलांचे शिक्षण आदींसाठी पैसे राहिले नाहीत. घेतलेले कर्ज फेडता येत नाही. नव्याने कर्ज मिळू शकत नाही. मासिक हप्ते फेडता येत नाहीत. शक्य आहे त्यांनी मदत केली. मदतीची याचना करण्यात अनेकांना संकोच वाटतो. यात्रा, उत्सव, धार्मिक कार्यक्रम होत नसल्याने लोककलावंतांची परिस्थिती गंभीर आहे. आता मदत न मिळाल्यास सावरणे अवघड होऊन जाईल, अशी कलावंतांची भावना आहे.

सर्वच स्तरातील कलाकार अडचणीत आहेत. बंद पडलेली नाटके सुरू झाली. मात्र, अल्पावधीत नाटय़गृहांना टाळे लागले. नाटकांवर अवलंबून असणारे घटक हतबल आहेत. मालिकांची फरफट होत असून बस्तान दुसरीकडे हलवावे लागल्याने नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. कलाक्षेत्रात कित्येकांकडे कामच नाही. अनेकांना उपजीविकेसाठी इतर कोणतेही काम स्वीकारावे लागत आहे. परिस्थिती अतिशय गंभीर असून सकारात्मक विचार करणे, हेच आपल्या हातात आहे.

– डॉ. संजीवकुमार पाटील, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक

निवेदकांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. लग्नसमारंभ, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महिन्याला ठरावीक उत्पन्न मिळत होते, त्यातून घरखर्च भागत होता. आता सगळं ठप्प असल्याने उत्पन्न शून्यावर आले आहे. हातावर पोट असणाऱ्यांपुढे अंधकार आहे.

– भाऊसाहेब कोकाटे, निवेदक