ज्येष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांची करडी शिस्त, कलाकारांची मेहनत, सर्वामध्ये असलेले कौटुंबिक वातावरण या आठवणींना उजाळा देत दिग्गजांनी मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाच्या स्मृती जागविल्या आणि आर्यन सिनेमा या पुण्यातील पहिल्या चित्रपटगृहाच्या शताब्दीनिमित्त शुक्रवारी स्नेहमेळावा रंगला. मात्र, शताब्दी साजरी करीत असताना ही वास्तू आपल्यामध्ये नाही याची खंत प्रत्येकालाच होती.
आर्यन चित्रपटगृहाच्या शताब्दीचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी, लीला गांधी, आशा काळे, अभिनेते शाहू मोडक यांच्या पत्नी प्रतिभा शाहू मोडक, दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ, आर्यनचे मालक बापूसाहेब पाठक यांचे चिरंजीव आनंदराव पाठक आणि चारुदत्त सरपोतदार यांच्याशी सुधीर गाडगीळ यांनी संवाद साधला. ‘आर्यन’च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सुलोचनादीदी यांच्या हस्ते झाले.
आर्यनला ‘मोलकरीण’, ‘गनिमी कावा’ यासह माझे अनेक चित्रपट यशस्वी झाले, असे सांगून सुलोचनादीदी म्हणाल्या, ‘तांबडी माती’ चित्रपटामधील भूमिकेसाठी दादा कोंडके यांच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही याची खंत बाबांना होती. ‘विच्छा’च्या प्रयोगातून मिळणारे पैसे घेऊन दादांनी हॉटेल सुरू करण्याची इच्छा प्रदर्शित केली तेव्हा बाबांनी त्यांना चित्रपट करण्याची सूचना केली. एवढेच नव्हे तर, आपल्याकडे असलेली ‘सोंगाडय़ा’ चित्रपटाची संहिता दादांना दिली. पुढे त्यांनी काय इतिहास घडविला हे मराठीच काय हिंदूी चित्रपटसृष्टीलाही माहीत आहे. बाबांनी एका भूमिकेसाठी राज कपूर यांना पाच हजार रुपये मानधन दिले तेव्हा खुद्द पृथ्वीराज कपूर यांनी केवळ पाचशे रुपये द्यावेत, असे सुचविले होते. त्या पैशांतून राज कपूर यांनी स्टुडिओ साकारला आणि त्यावर भगवा झेंडा लावला.
‘केला इशारा जाता जाता’ चित्रपटाच्या पंढरपूर येथील प्रीमियरला जाण्यासाठी ३५० रुपयांचा नवीन शालू घेतल्याची आठवण लीला गांधी यांनी सांगितली. आर्यन सिनेमामध्ये राजाभाऊ परांजपे हे पेटी घेऊन स्टंट म्सुझिक देत असत. त्यातूनच त्यांना चित्रपटाविषयी गोडी निर्माण झाली, असे सांगत राजदत्त यांनी ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा प्रसंग जिवंत केला. आर्यन सिमेमा ही वास्तू आपल्यामध्ये नाही. पण, बापूसाहेब पाठक यांचे स्मारकदेखील उभारले नाही, अशी खंत आनंदराव पाठक यांनी व्यक्त केली. पूर्वार्धात आर्यनमध्ये महोत्सवी ठरलेल्या चित्रपटांतील गीते जितेंद्र भुरूक आणि सहकाऱ्यांनी सादर केली.