पुण्यात रिक्षाचालकांच्या पुढाकाराने उपक्रम

पुणे : करोना रुग्णाला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी लागणारा वेळ आणि रुग्णवाहिकांच्या अपुऱ्या संख्येमुळे आजवर अनेक रुग्ण दगावले असल्याने रुग्णवाहिकेला पर्याय म्हणून रिक्षातच प्राणवायूचा सिलिंडर बसवून रिक्षा रुग्णवाहिकेची सुविधा पुण्यात सुरू करण्यात आली आहे. बघतोय रिक्षावाला फोरमने त्यासाठी पुढाकार घेतला असून, आठवडय़ात अशा १०० रिक्षा कार्यान्वित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. वाजवी दरातील या सुविधेसाठी ९६५७२८९४११ या संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.

फोरमचे संस्थापक अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, की सध्या रुग्णवाहिकांची कमतरता जाणवते आहे. त्याचप्रमाणे काहींकडून त्यासाठी मोठय़ा शुल्काची आकारणी केली जाते. रुग्णालयात खाट मिळविण्याचा प्रयत्नात होणाऱ्या प्रवासात रुग्णाला प्राणवायू आवश्यक असतानाही तो न मिळाल्यास तो गंभीर होऊ शकतो. काहींचे प्राणही यामुळे गेले आहेत. ही बाब लक्षात घेऊन रिक्षातच प्राणवायू सििलडर बसविण्याचा उपक्रम पुढे आला.

सध्या करोना काळात रिक्षाचालकांचा व्यवसाय घटला आहे. दुसरीकडे रुग्णांना रुग्णालयापर्यंतच्या प्रवासासाठी मोठा खर्च करावा लागतो आहे. त्यामुळे अर्धा ते पाऊन तासाच्या प्रवासासाठी मीटरनुसार रिक्षा भाडे, प्राणवायू आणि त्यासाठीच्या मास्कचा खर्च मिळून केवळ ३०० रुपयांत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या तीन रिक्षा सुरू असून, आठवडय़ात संख्या शंभरवर नेण्यात येणार आहे.