पुणे-लोणावळा मार्गावरील नव्वद टक्के काम पूर्ण

लांब पल्ल्याच्या गाडय़ांसह पुणे ते मुंबई एक्स्प्रेस आणि पुणे ते लोणावळा उपनगरीय वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पुणे-लोणावळा लोहमार्गावर सध्या अत्याधुनिक स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम प्रगतिपथावर आहे. सध्या नव्वद टक्क्य़ांच्या आसपास काम पूर्णत्वाला आले आहे. या यंत्रणेमुळे या मार्गावरून गाडय़ांचा वेग वाढून प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच गाडय़ांची संख्याही वाढविता येणार असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. मुंबईनंतर राज्यात प्रथमच मोठय़ा टप्प्यामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

पुणे- मुंबई दरम्यानच्या एक्स्प्रेस गाडय़ा आणि लोणावळा उपनगरीय वाहतुकीतील गाडय़ांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, सद्य: स्थितीत ते शक्य होत नसल्याचे वास्तव आहे. पुणे- लोणावळा मार्गावर उपनगरीय लोकल गाडय़ांच्या  दररोज सुमारे ४४ फेऱ्या होतात. सुमारे १२० एक्स्प्रेस गाडय़ा आणि २५ ते ३० मालगाडय़ा या मार्गावरून दररोज जातात. त्यात लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा प्रामुख्याने समावेश आहे. लोहमार्गाच्या देखभालीचा दिवसातील काही वेळ वगळता इतर वेळेला अगदी मध्यरात्र ते पहाटेपर्यंतही हा मार्ग व्यस्त असतो. अशा स्थितीत गाडय़ांची संख्या वाढविणे शक्य नसल्याचे स्पष्ट होते आहे. पुणे- लोणावळा या मार्गाचे चौपदरीकरण नियोजित आहे. या प्रकल्पाला मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे गाडय़ांचा वेग वाढवून काही गाडय़ा वाढविण्याच्या दृष्टीने सध्याचा स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

पुणे- लोणावळा मार्गावर सुमारे दीड वर्षांपूर्वी स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम सुरू करण्यात आले होते. सद्य:स्थितीत लोणावळा ते देहूरोड या टप्प्यामध्ये सुमारे ४० किलोमीटर अंतरापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात चिंचवड स्थानकापर्यंतचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर शिवाजीनगरच्या टप्प्यात काम करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत कामाने वेग घेतला असल्याने संपूर्ण प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. सध्याच्या सिग्नल यंत्रणेत गाडय़ांच्या वेगावर मर्यादा येत आहेत. पुणे- लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकल गाडय़ांसाठी सध्या १०० किलोमीटर वेगाने धावू शकणारे डबे जोडण्यात आले आहेत. सिग्नलचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सर्वच टप्प्यात गाडी १०० किलोमीटर वेगाने धावू शकेल. गाडय़ा विनाअडथळा पुढे जाऊन त्यातून प्रवासाचा वेळही वाचू शकेल. त्याचप्रमाणे गाडय़ांची संख्याही वाढविता येणार आहे.

नव्या सिग्नल यंत्रणेची प्रक्रिया कशी?

पुणे- लोणावळा मार्गावर सध्याही स्वयंचलित सिग्नल यंत्रणा आहे. मात्र, नव्याने बसविण्यात येत असलेल्या सिग्नल यंत्रणेची प्रक्रिया अत्याधुनिक आणि मुंबईप्रमाणे एकापाठोपाठ गाडय़ा पुढे पाठविण्यासाठी उपयुक्त आहे. सध्याच्या पद्धतीनुसार गाडय़ा पुढे पाठविण्यासाठी दोन स्थानकांमधील अंतर हेच प्रमाण ठेवले जाते. उदा: शिवाजीनगर स्थानकातून एखादी गाडी मुंबईच्या दिशेने जात असल्यास तिने शिवाजीनगर स्थानक सोडल्याशिवाय याच मार्गावर पुणे स्थानकातून दुसरी गाडी सोडली जात नाही. त्यामुळे दोन गाडय़ांमध्ये मोठे अंतर राहते आणि प्रवासाचा वेळ वाढतो. नव्या यंत्रणेमध्ये प्रत्येक किलोमीटरला एक सिग्नल उभारण्यात येत आहे. त्यामुळे दोन गाडय़ांमध्ये स्थानकाचे नव्हे, तर दोन सिग्नलचे अंतर ठेवले जाईल. त्यामुळे दोन गाडय़ांमध्ये केवळ एक किलोमीटरचे अंतर ठेवून गाडय़ा वेळेत पुढे पाठविल्या जातील.

पुणे- लोणावळा मार्गावर अत्याधुनिक नव्या स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे ४० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. फेब्रुवारीअखेर चिंचवडपर्यंत काम पूर्ण होईल. त्यानंतर शिवाजीनगपर्यंतचा टप्पा घेतला जाईल. या यंत्रणेमुळे गाडय़ांमधील अंतर कमी होऊन गाडय़ा वेळेत धावणे शक्य होईल. वेगही वाढून प्रवासाचा वेळ कमी झाल्याने प्रवाशांना त्याचा फायदा मिळू शकेल.    – मनोज झंवर, पुणे रेल्वे जनसंपर्क अधिकारी