बी. टी. पंडित लेफ्टनंट जनरल (निवृत्त) 

क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस या स्वातंत्र्यवीरांविषयी माझ्या मनात आकर्षण होते. मी नेतृत्व केलेल्या १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये लढाईचा थरार मी जवळून पाहिला. त्यामुळे युद्धनीती, शस्त्रनीती आणि पहिल्या महायुद्धापासून ते कारगिल युद्धापर्यंत प्रत्येक घडामोडीचा प्रवास मी पुस्तकांतून समजून घेतला. भारताचा स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त मी अनुभविलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि स्वातंत्र्योत्तर काळातील परिस्थितीचा माझ्या वाचन प्रवासातून घेतलेला वेध मांडण्याचा हा प्रयत्न..

यवतमाळमधील घाटंजी हे माझं मूळ गाव. आमच्या गावामध्ये वीज नसल्याने मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव होता. त्यात एकीकडे ब्रिटिशांचे राज्य आणि दुसरीकडे हैदराबाद येथून येणाऱ्यांकडून आमच्या भागात होणारी लूट अशा दोन्ही संकटांमध्ये स्वसंरक्षण करण्याचे दिव्य आम्ही पार पाडत होतो. स्वातंत्रलढा सुरू असल्याने स्वातंत्र्यवीरांच्या गोष्टी आणि तेव्हाची परिस्थिती पाहून लष्करात जाण्याचे मनाशी पक्के झाले. माझे वडील (त्र्यंबक पंडित) हे रामदास स्वामींचे भक्त होते. त्यामुळे आमच्या घरामध्ये दासबोध होता. आई (रमाबाई पंडित) मनाचे श्लोक, रामरक्षा पठण करून घेत असे. त्यामुळे लहानपणापासून माझ्यावर मराठी साहित्याचे चांगले संस्कार झाले.

शाळेमध्ये एक चांगला विद्यार्थी म्हणून माझी ओळख होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची पुस्तके वाचतच मी मोठा झालो. रामायणापेक्षा महाभारतातील कथा वाचणे मला जास्त आवडायचे. त्यामुळे आमच्या घरामध्ये ऐतिहासिक पुस्तके मोठय़ा प्रमाणात होती. शाळेमध्ये संस्कृतचा विद्यार्थी असल्याने संस्कृत साहित्य काही प्रमाणात होते. शाळेमध्ये स्काउट, एनसीसी अशा सेवा संस्थांमध्ये मी काम केले. अभ्यासासह इतर गोष्टींमध्ये हुशार असताना, त्याला लष्करात का पाठवताय, असा प्रश्न अनेक जण आमच्या घरच्यांकडे करीत होते. तरीही माझ्या घरच्यांनी मला एनडीए डेहराडून येथे पाठविले. लहानपणी माझ्या जडणघडणीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा होता. सांघिक कार्य आणि समाजसेवा हे दोन संस्कार संघामुळे माझ्यावर घडले. ते संस्कार मला लष्करामध्ये खूप उपयोगी पडले. एनडीएमध्ये जायचे म्हणजे इंग्रजी संभाषण आणि लेखन महत्त्वाचे होते. मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी होतो. त्यामुळे इंग्रजीशी जमणे तसे कठीणच होते. परंतु शाळेतील शिक्षकांनी वर्गातील काही मुलांना हेरून ‘तुम्ही इंग्रजी शिका, पुढे खूप आवश्यक आहे,’ असे सांगत आमचा एक संघ तयार केला. त्यामुळे माझ्या इंग्रजी संभाषण कौशल्यामध्ये भर पडत गेली. इंग्रजी कादंबऱ्यांच्या वाचनाला याच काळात सुरुवात झाली.

लष्करी शिक्षण सुरू असताना चालू घडामोडींविषयी मासिकांमधून वाचून युद्ध व शस्त्रांविषयीचे ज्ञान मिळत होते. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, वॉर ऑफ इन्डिपेंडन्स, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, नेपोलियन, महाराणा प्रताप, मराठय़ांचा इतिहास यांविषयीची अनेक पुस्तकांचे वाचन केले. त्यामुळे देशाविषयीचे केवळ प्रेमच नव्हे, तर लढण्याची ताकद मला या साहित्याने दिली. लष्करातील कार्यकाळात मी मद्रास इंजिनिअरींग ग्रुप, सीएमई (लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय), कारगिल, जम्मू, नागालँड, हैदराबाद, लडाख, १९७१ चे भारत-पाक युद्ध, इराक, त्रिवेंद्रम, पूँछ, पंजाबसह दिल्ली येथील लष्कर मुख्यालय अशा विविध ३० ठिकाणी काम केले. सनिकांना प्रशिक्षण देण्याकरिता सुरू असलेल्या दौऱ्यांदरम्यान त्या त्या ठिकाणची राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती माहिती असणे गरजेचे असते. त्यामुळे चीन, नागालँड, खलिस्तान आणि पंजाबमधील परिस्थितीबाबत मी अभ्यास केला. लष्करी तांत्रिक बाबींसोबत आंतरराष्ट्रीय संबंध आणि देशांतर्गत प्रश्नांबाबतची माहिती मला पुस्तकांमधून किंवा स्थानिकांकडून मिळाली. त्यासाठी वाचन हे उपयुक्त माध्यम ठरले.

मी एकाच वेळी विविध विषयांच्या पुस्तकांचे वाचन करीत असे. लष्करी निगडित, आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधी, उत्तम कादंबऱ्या आणि थरारक, गूढ रहस्यकथा वाचायला मला आवडतात. लष्करी सेवेतील निवृत्तीनंतर मी १९९२ मध्ये पुण्याला स्थायिक झालो. तेव्हापासून मी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील ग्रंथालयामध्ये आवर्जून जातो. ‘ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’, ‘१९७१ अ सॅपर्स वॉर’, ‘पानिपत’, ‘अफगाणिस्तान अँड द तालिबान’, ‘फाळणीची शोकांतिका, ‘क्रायसिस इन कमांड’, ‘आर.एस.एस. ए व्हिजन इन अ‍ॅक्शन’, ‘द सर्च फॉर सोसायटी’, ‘सहा सोनेरी पाने’, ‘इंडियाज फ्रीडम स्ट्रगल, ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘राजा शिवछत्रपती’ अशी अनेक पुस्तके माझ्या बुकशेल्फमध्ये आहेत. दिव्यांग असलेल्या निवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिटय़ूट या संस्थेसह सेंट्रल सनिक स्कूल सोसायटी, आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी, पूर्व सनिक सेवा परिषद यांसारख्या अनेक सामाजिक संस्थांमध्ये मी कार्यरत आहे. केवळ लष्करी अधिकारीच नाही, तर प्रत्येक नागरिकाने वाचन करायला हवे. देशासाठी लष्करी अधिकारी आणि जवान आपल्या प्राणांची बाजी लावतात. यामागे केवळ शक्तीच नाही, तर त्यांचे देशाप्रती प्रेम आणि प्रत्येक विषयासंबंधी पूर्वाभ्यास असतो.