22 September 2020

News Flash

‘तूच आहेस पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार’, विश्वजित कदम यांच्याविरोधात पुण्यात फलक

पक्ष संपवण्याची शपथ घेतली होती. ती पूर्ण झाली, असा टोला लगावला आहे.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्याविरोधात ठिकठिकाणी फलक लावल्याची घटना ताजी असतानाच आता युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्याबद्दलही फलक लावण्यात आले आहेत.

कलात्मक आणि उपहासात्मक पाट्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात आता आणखी एका नव्या फलकामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्याविरोधात ठिकठिकाणी फलक लावल्याची घटना ताजी असतानाच आता युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्याबद्दलही फलक लावण्यात आले आहेत. ‘तूच आहेस पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार’ असे शीर्षक देऊन त्यांना पुण्यातून परत सांगलीला जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फलकाच्या खाली काही व्यक्तींची नावे लिहिण्यात आली आहेत. असे फलक अनेक ठिकाणी लावण्यात आल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आजच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळून आल्याचे दिसून येते.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर तुम्ही पक्ष संपवण्याची शपथ घेतली होती. ती आता पूर्ण झाली, असा टोला या फलकातून लगावला आहे. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीतून हा प्रकार झाल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वीच विश्वजित कदम आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. तेव्हापासून विश्वजित कदम हे सार्वजनिक कार्यक्रम टाळताना दिसत आहेत. काँग्रेसने जीएसटीसंदर्भात माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचे व्याख्यान आयोजित केले होते. निमंत्रणपत्रिकेत कदम यांचे नाव होते. परंतु, त्यावेळीही त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली होती. विश्वजित कदम हे माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत.

मुळचे सांगलीचे असलेले विश्वजित कदम हे मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर पुणे लोकसभा मतदारसंघातून उभे होते. मोदी लाटेत या मतदारसंघातून अनिल शिरोळे हे निवडून आले. कदम यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला समाधानकारक यश मिळाले नव्हते. महापालिका निवडणुकीतही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबद्दलही अशाचप्रकारचे फलक पुण्यात लावण्यात आले होते. पुण्यात कचऱ्याचा प्रश्न निर्माण् झाल्यानंतर काही दिवसांनी हे फलक लावण्यात आले होते. त्यावेळी मोठी चर्चा झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 5:46 pm

Web Title: banners against congress leader vishwajeet kadam in pune
Next Stories
1 देखाव्यातून ‘महाराष्ट्राची लोकधारा’ टिकवण्याचा जवळेकर कुटुंबाचा प्रयत्न
2 आधार केंद्र नव्हे, शिबिरांवरच बोळवण!
3 तीन दिवस गर्दीचे
Just Now!
X