संवेदनशील वातावरण आणि नाजूक परिस्थितीचा सामना करीत नाटय़संमेलन यशस्वी केलेले बेळगावकर आता सरकारी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. विशेष बाब म्हणून ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा झाली खरी, पण संमेलन होऊन दहा दिवस झाले तरी या रकमेचा धनादेश अद्यापही हाती पडलेला नाही.
राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार अनुदानाची रक्कम अद्याप आलेली नाही. याला नाटय़ परिषदेच्या बेळगाव शाखेच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी दुजोरा दिला. आमच्या पातळीवर ६५ लाख रुपये संकलित करून संमेलन करण्यामध्ये आम्हाला यश आले आहे. सरकारचे अनुदान मिळाल्यावर जमा आणि खर्च याचा ताळमेळ कसाबसा बसू शकेल. अन्य ठिकाणच्या संमेलनांमध्ये संयोजक संस्थेला चार पैसे मिळतात तसे आम्हाला मिळणार नाहीत, पण प्रतिकूलतेवर मात करीत नाटय़संमेलन यशस्वी करू शकतो हा लाखमोलाचा अनुभव गाठीशी आला असल्याची भावना वीणा लोकूर यांनी व्यक्त केली.
संमेलनाच्या निधिसंकलनामध्ये अडचण असल्याचे ध्यानात आल्यानंतर सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी विशेष बाब म्हणून या संमेलनासाठी अनुदानामध्ये दुप्पट वाढ केली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बेळगाव भेटीमध्ये ५० लाख रुपये अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. सामान्य बेळगावकरांपासून ते उद्योजकांनी संमेलन हे आपले घरचे कार्य समजून अगदी शंभर रुपयांपासून यथाशक्ती मदत केली. नितीन खोत या उद्योजकाने दोन लाख रुपयांची देणगी दिलीच, पण त्याचबरोबरीने २० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्जही दिले. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी त्यांना ‘पोस्ट डेटेड चेक’ दिले असल्याचे मला समजले आहे. सध्या असलेल्या निधीतून मंडप आणि भोजनव्यवस्था या सेवा देणाऱ्यांची बिले दिली आहेत. अजूनही काही मदतीचे धनादेश येत आहेत. आता सरकारच्या अनुदानाचा धनादेश मिळाल्यानंतर सारे खर्च भागविणे शक्य होणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी नाटय़ परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीसाठी मुंबईला जाणार असून त्या वेळी साऱ्या बाबी स्पष्ट होतील, असेही वीणा लोकूर यांनी सांगितले.