२० हजार क्विंटल भुसार मालाची आवक

पुणे : पोलिसांच्या आठमुठेपणामुळे भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी सोमवारपासून (१३ एप्रिल) मार्केट यार्डातील भुसार बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याने खरेदीदारांनी शनिवारी बाजारात गर्दी के ली. दरम्यान, घाऊक भुसार बाजारात शनिवारी २० हजार ७८० क्विंटल भुसार मालाची आवक झाली.

भुसार बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने किरकोळ बाजारातील खरेदीदार तसेच घरगुती ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. घाऊक बाजारात शनिवारी भुसार मालाची मोठी आवक झाली. शहरातील किराणा माल विक्रेत्यांनी खरेदीसाठी गर्दी केली. जवळपास दोन हजार वाहनांमधून शहर तसेच उपनगरातील किरकोळ कि राणा माल विक्रेत्यांकडे भुसार माल पोहचविण्यात आला. टाळेबंदी ३० एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आल्याने भीतीपोटी मोठय़ा प्रमाणावर खरेदी होत आहे.

पोलिसांकडून घाऊक बाजारातील व्यापारी तसेच कामगारांची अडवणूक होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले ओळखपत्र असताना व्यापारी आणि कामगारांना पोलिसांकडून होणाऱ्या अडवणुकीला सामोरे जावे लागत आहे. त्या निषेधार्थ भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या दी पूना र्मचट्स चेंबरकडून सोमवारपासून भुसार बाजार अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.