मध्यभागातील अनेक मंडळांकडून नियमांची पायमल्ली; रस्त्यांवर वाहतुकीचा बोऱ्या

भव्य-दिव्यतेच्या नावाखाली अनेक मंडळांकडून रस्ते व्यापणारे आणि बहुमजली मांडव उभारण्यात आल्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. मंडप उभारणीबाबत सरसकट नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारे मांडव पंधरा दिवसांपूर्वीपासूनच शहरात उभारण्यात आले आहेत. देखाव्यांचे कामही भरदिवसा रस्त्यावर केले जात आहे. अरुंद गल्ल्यांमध्ये इमारतीला लागून मांडव उभारण्यात आल्याने स्थानिक नागरिकांचीही गैरसोय होत आहे.

पुण्यातील गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे. आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणे नव्हे तर परराज्यातूनही उत्सवाच्या काळात भाविक येतात. यंदा उत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने देखावे भव्य-दिव्य करण्याचा संकल्प अनेक सार्वजनिक मंडळांनी केला आहे.

शहरातील मध्यभागात पंधरा दिवसांपूर्वीपासून मांडव उभारण्यात आले आहेत. अनेक मंडळांनी उभारलेल्या मांडवाचा आकार मोठा असून त्यांनी रस्ते व्यापून टाकले आहेत. गेल्या आठवडय़ापासून देखाव्यांचे काम सुरू झाले आहे. देखाव्यांचे काम दिवसा सुरू असल्याने सदाशिव पेठ भागात वाहतूक कोंडी होत आहे. अनेक मंडळांकडून मांडव रस्त्यापासून काही उंचीवर नेऊन ठेवण्यात आले आहेत. त्याबाबत वाहतुकीला अडथळा नको, अशी सारवासारव मंडळांकडून केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात मांडवाखालून जाण्यासाठी अगदी छोटा रस्ता ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे.

गेल्या काही वर्षांपासून बैठे मांडव घालण्यापेक्षा अनेक मंडळांनी मांडव जमिनीपासून काही फूट उंच बांधून खाली वाहनांना रस्ता उपलब्ध करून दिला आहे. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या मांडवांमुळे रस्ता व्यापला जातो. मांडवाच्या खालून जाणारा छोटा रस्ता फक्त दुचाकी वाहने वापरू शकतात. त्यामुळे चारचाकी वाहनांसाठी मध्यभागातील रस्ते गणेशोत्सव संपेपर्यंत अघोषित बंद ठेवण्यात आले आहेत. मांडव जमिनीपासून काही फुटांवर बांधून खालून रस्ता असा नवीन प्रकार मंडळांमध्ये लोकप्रिय ठरला आहे.

अरुंद गल्ल्यांमध्ये उभारलेले हे मांडव काही इमारतींच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले आहेत. अशा इमारतीतील सदनिकांच्या गॅलरी मांडवामुळे आच्छादित झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे. मंडळाविरुद्ध तक्रार करण्यापेक्षा पुढील पंधरा दिवस ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’, अशी प्रतिक्रिया रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.

रस्त्यांबरोबरच पदपथदेखील व्यापले

मंडळांकडून उभारण्यात आलेल्या मांडवांनी रस्ते व्यापले आहेत. त्यापुढे जाऊन काही मंडळांच्या मांडवांनी पदपथ व्यापले आहेत. अरुंद गल्ल्यांमध्ये दररोज सकाळी आणि सायंकाळी होणारी कोंडी ही नित्याची झाली आहे. मांडवांमुळे कोंडीत आणखी भर पडणार आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यांवरून चालणेदेखील अवघड झाले असून ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.