वाकड परिसरातील घटना
भरधाव टेम्पोने मोटारीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारचालकासह प्रवासी ठार झाला. वाकड चौकात शनिवारी ( ४ मे) पहाटे ही दुर्घटना घडली. या अपघातात मोटारीतील प्रवासी महिला गंभीर जखमी झाली.
मोटारचालक सद्दाम नजीर शेख (वय २३, रा. कांदे आळी, जनता वसाहत) आणि प्रवासी शशिधरण पण्णीकर (वय ६५) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर सिमी शशिधरण पण्णीकर (वय ४०) जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी वाकड पोलिसांनी टेम्पोचालक चन्नाप्पा बसाप्पा हत्ते (वय ३५, रा. भुजबळ वस्ती, वाकड)याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमी पण्णीकर या हिंजवडीतील एका तारांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापक आहेत. त्यांचे वडील शशीधरण हे सिमी यांना भेटण्यासाठी पुण्यात आले होते. शनिवारी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास शशिधरण यांना विमानतळावर सोडण्यासाठी सिमी या मोटारीतून निघाल्या होत्या. वाकड येथील चौकात (वाय जंक्शन) टेम्पोने मोटारीला धडक दिली. अपघातात मोटारचालक सद्दाम आणि शशिधरण यांचा जागीच मृत्यू झाला, तर सिमी या गंभीर जखमी झाल्या. सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे तपास करत आहेत.