केंद्रात भाजपा सरकार आल्यानंतर निवडणुकीपूर्वी त्यांनी दिलेल्या कोणत्याही आश्वासनाची पुर्तता अद्याप झालेली नाही. उलट त्यांनी काँग्रेसच्या पुढे जात देशात भयानक परिस्थिती निर्माण केली आहे. देशातील परिस्थितीला सर्वस्वी भाजपा सरकारच जबाबदार आहे, अशा शब्दांत स्वराज्य अभियानचे कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भूषण म्हणाले, देशातील आगामी लोकसभा निवडणूक भाजप अयोध्या प्रकरण, हिंदू आणि मुस्लिम या मुद्यांवरच लढवेल. तसेच येत्या काळात सरकारकडून समाजातील विविध घटकांमध्ये दंगली घडविल्या जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या कार्यपध्द्तीवर यावेळी त्यांनी सडकून टीका केली.

लोकसभा निवडणुकीपूर्वी तरुणांना रोजगार दिला जाईल, शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील अशा अनेक घोषणा मोदी सरकारने केल्या. मात्र, त्याची आज अखेरपर्यंत अंमलबजावणी केली नाही. ही शोकांतिका असून याच सरकारने दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतला. मात्र, त्यातून काहीही साध्य झाले नाही. फक्त उद्योगपतींचे भले झाल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने नोटाबंदीच्या निर्णयातून आपण कॅशलेस व्यवहारांकडे जात असल्याचे सांगितले. मात्र, जनतेकडील पैसा काढून घेऊन त्यांनी जनतेलाच कॅशलेस बनवल्याची खोचक टीका प्रशांत भूषण यांनी केली.

भूषण म्हणाले, देशात सध्या अस्थिरता निर्माण झाल्याने सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच रोजगार, भ्रष्टाचार यांसह अनेक मुद्द्यावर लढण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अण्णा हजारे हे येत्या काळात आंदोलनास सुरुवात करणार आहेत. यावर भाष्य करताना भूषण म्हणाले अण्णांनी यापूर्वी लोकपाल बिलाबाबत केलेल्या आंदोलनाचे काय परिणाम झाले. त्यामुळे आण्णांनी आता भ्रष्टाचारासारख्या मुद्यावर लढावे यासाठी आम्ही त्यांचे स्वागत करू, असे त्यांनी सांगितले.

न्यायाधीश लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणावर बोलताना प्रशांत भूषण यांनी भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले, न्या. लोया मृत्यूप्रकरणी विविध प्रकारची माहिती समोर येईल, या भीतीने सरकार कोणत्याही प्रकारची पाऊले उचलताना दिसत नाही.