राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या जोरावर भाजपचे ताकद वाढवण्याचे प्रयत्न
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ
गेल्या विधानसभा निवडणुकीपासून बदललेले राजकारण, प्रभागांची झालेली फेररचना, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या दारी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पक्षांतर्गत स्पर्धा, त्यातून स्थानिक पातळीवर झालेल्या उलाथापालथी आणि गावकी-भावकीचे राजकारण या घडामोडींचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या वडगांवशेरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीची पडझड होण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे आव्हान मोडून काढण्यासाठी भाजपकडून आखण्यात येत असलेल्या व्यूहरचना योग्य ठरणार की नाही, याचे चित्र महिनाभरातच स्पष्ट होईल.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या वडगांवशेरी विधानसभा मतदार संघातील राजकारण गेल्या विधानसभा निवडणुकीपासून बदलले. या मतदार संघात महापालिकेचे सध्याचे अकरा प्रभाग येतात. मात्र, फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेत बदल करण्यात आल्यानंतर वडगांवशेरी विधानसभा मतदार संघातील प्रभागांची संख्या सहावर आली आहे. या विधानसभा मतदारसंघातील अकरा प्रभागातून बावीस नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे वर्चस्व राहिले. काँग्रेसचे दोन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक नगरसेवक वगळता सर्व नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन नगरसेवक या मतदार संघातून निवडून आले होते. त्यांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला.
विधानसभा निवडणुकीपर्यंत भारतीय जनता पक्षाची या मतदार संघात फारशी ताकद नव्हती. शिवसेनेच्या मदतीने येथे राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून होत होता. विधानसभा निवडणुकीत युती संपुष्टात आली तशी आघाडीतही बिघाडी झाली. त्यामुळे सर्वच पक्षाचे उमेदवार स्वतंत्रपणे लढले. भाजपकडून जगदीश मुळीक यांना उमेदवारी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर मुळीक निवडून आले. राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांना पराभूत करण्याची किमया त्यांनी साधली. त्यानंतरही या प्रभागात भाजपचे मोठे वर्चस्व होते, खूप ताकद वाढली असेही नव्हते. मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या राजकीय घडामोडींनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पक्षाचीच पडझड सुरु झाली.
भाजपची ताकद काही उपनगरांमध्ये कमी आहे, हे लक्षात घेऊन प्रथम वडगांवशेरी विधानसभा मतदार संघात भाजपकडून ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्या नंतर फोडाफोडीचे राजकारणही सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे काही नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झाले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी, अनिल टिंगरे, शीतल सावंत, सुनीता गलांडे या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या रेखा टिंगरे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. रिपाइंच्या सुनंदा देवकर शिवसेनेत दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मतदार संघाकडे लक्ष देताना येथे काही कार्यक्रम घेतले. या घडामोडीनंतर स्थानिक पातळीवरही काही प्रमाणात उलथापालथ झाली. उमेदवारी मिळण्यास सक्षम ठरणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनीही पक्षांतरास सुरुवात केली. राष्ट्रवादीची कमकुवत होत असलेली बाजू आणि भाजपच्या गळाला लागलेले नगरसेवक यामुळे माजी आमदार बापू पठारे यांनी स्वत: महापालिकेची निवडणूक लढविण्याची तयारी केल्याची चर्चाही मध्यंतरी रंगली होती. मात्र त्यांच्या नातेवाइकालाच उमेदवारी देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून रिंगणात असलेले सुनील टिंगरे हे देखील भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. मात्र राजकीय स्पर्धा लक्षात घेऊन स्थानिक आमदारांनी त्यांचा प्रवेश रखडविला असल्याचीही चर्चा आहे. या मतदार संघात मुळात काँग्रेसची तशी ताकद नाही. तर मनसेकडून निवडणूक लढविलेले नारायण गलांडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. ही राजकीय उलाथापालथ काही प्रमाणात भाजपच्या फायद्याची ठरणार असली आणि तूर्तास राष्ट्रवादीच्या आयाराम नगरसेवकांच्या जोरावर वडगांवशेरी विधानसभा मतदार संघ जिंकण्याच्या भाजपच्या हालचालींना यश येणार की नाही, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.