रिक्षाचालकांना १५०० रुपये अर्थसहाय्य मिळालं पाहिजे या मागणीसाठी खासदार गिरीश बापट यांनी आरटीओ कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान गिरीश बापट आंदोलनासाठी बसले असताना एक आंदोलनकर्ता यांच्या मागे बसला होता. तेवढ्यात एक जण म्हणाला, बापट साहेब (त्या कार्यकर्त्याच्या नावाचा शॉर्ट फॉर्म ईडी असा होत असल्याने) तुमच्या मागे ईडी बसला आहे. हे ऐकताच गिरीश बापट म्हणाले, अशा ईडी फिडीना मी काय घाबरत नाही असं उत्तर दिलं.

“आजवर असंख्य आंदोलनं केली असून आमच्याकडे ईडीला येऊन काय मिळणार आहे. आमच्या खिशात चणे, फुटाणे आणि शेंगदाणे मिळणार,” असं म्हणताच उपस्थित आंदोलनकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला. “ईडी येऊ देत आणि जाऊ देत, आमच्यासाठी ईडी म्हणजे रिक्षाचालक,” असल्याचं त्यांनी सांगितले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांना १५०० रुपये अर्थसहाय्य दिले जाणार असल्याची घोषणा राज्य सरकार मार्फत करण्यात आली. मात्र अद्यापही रिक्षाचालकांना अर्थसहाय्य मिळाले नसल्याने पुण्यातील आरटीओ कार्यालयाबाहेर खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान गिरीश बापट म्हणाले की, “करोना महामारीमुळे संपूर्ण बाजार पेठ ठप्प झाली असून त्यामुळे हातावर पोट असलेल्या लोकांचे जगणे मुश्किल झाले. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महिन्याभरापूर्वी एक पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये रिक्षाचालकांना १५०० रुपये अर्थसहाय्य मदत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली. मात्र अद्यापही कोणाच्याही खात्यात ती रक्कम जमा न झाल्याने आज आम्ही आरटीओ कार्यालयाच्या पायर्‍यांवर मूक आंदोलन करीत आहोत, सरकारने या घटकाला लवकरात लवकर मदत द्यावी,” अशी मागणी देखील त्यांनी केली.