भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदासाठी तीव्र रस्सीखेच सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपद हे  पक्षाच्या दृष्टीने जिल्हा दर्जा असलेले पद असून पक्षाचे दोन्ही आमदार शहराध्यक्षपदासाठी अनुत्सुक आहेत. मात्र, या पदासाठी प्रबळ इच्छुक असणाऱ्या ११ पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र चांगलीच चढाओढ सुरू आहे.

विधानसभा निवडणुकांपूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, तेव्हाच इच्छुकांची तयारी सुरू झाली होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुका पार पडेपर्यंत जगताप यांनाच हे पद सांभाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनाही पाटील यांनी हेच उत्तर दिल्याने मधल्या काळात शहराध्यक्षपदाचा विषय थंडावला होता.

निवडणुका पार पडल्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांचा कार्यक्रम निर्णायक टप्प्यावर आला आहे. लक्ष्मण जगताप पुन्हा शहराध्यक्ष व्हावेत, यासाठी एक गट प्रयत्नशील आहे. मात्र, ते स्वत: पुन्हा शहराध्यक्ष होण्यास इच्छुक नाहीत. दुसरे आमदार महेश लांडगे यांनाही शहराध्यक्षपदात स्वारस्य नाही. लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, पक्षनेते एकनाथ पवार, पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक उमा खापरे, राजू दुर्गे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी ११ जणांनी या पदावर दावा केला आहे. आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहराध्यक्षाची निवड केली जाणार आहे. सामंजस्याने एका नावावर संमती होऊ शकते का, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र स्थानिक पातळीवर एकमत न झाल्यास पक्षश्रेष्ठींकडून एखाद्या नावावर थेट शिक्कामोर्तब केले जाऊ शकते.

बुथसमित्यांची निवड झाल्यानंतर मंडलाध्यक्षांची निवड होईल. त्यानंतर २५ डिसेंबरला जिल्हाध्यक्षांचे नाव निश्चित होईल. शहराध्यक्षपदासाठी ११ जणांनी इच्छा प्रदर्शित केली आहे. सर्वाचे मत जाणून घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अंतिम निर्णय होईल. – प्रमोद निसळ, सरचिटणीस, शहर भाजप आणि निवडणूक अधिकारी