News Flash

भाजपाला बसणार धक्का; जयसिद्धेश्वर शिवाचार्यांची खासदारकी धोक्यात

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांचा जातीचा दाखला बनावट

भाजपाला सोलापूरमध्ये मोठा धक्का लागण्याची शक्यता आहे. सोलापूरचे भाजपा खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचं जात पडताळणी समितीनं म्हटलं असून, त्यांचा जातीचा दाखला रद्द केला आहे. त्यामुळे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांची खासदारकी धोक्यात आली आहे.

सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून भाजपाचे खासदार तथा गौडगाव वीरशैव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या दोघांचा पराभव केला होता. निवडणूक अर्ज भरताना त्यांनी लिंगायत समाजातील बेडा जंगम या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. विनायक कंदकुरे, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड व मिलिंद मुळे या तिघांनी त्यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. यासंदर्भात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांच्या बेडा जंगम जात प्रमाणपत्राची पडताळणी होऊन तक्रारदारांच्या आक्षेपावर सुनावणी झाली.

जात पडताळणीत समितीने खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांनी सादर केलेला जातीचा दाखला बनावट असल्याचं सांगत त्यांचा जातीचा दाखला रद्द केल्याची माहिती तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी दिली आहे. त्यांना अधिकाऱ्यांनी फोनवरुन जातीचा दाखला रद्द केल्याची माहिती दिल्याचं ते म्हणाले.

उच्च न्यायालयात याचिका

“खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्यावतीने यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात जात प्रमाणपत्राच्या संदर्भात याचिका दाखल करताना संबंधित मूळ कागदपत्रे जोडली आहेत. त्यामुळे मूळ कागदपत्रे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करता आली नाहीत. दक्षता समितीने दिलेले तिन्ही अहवाल अविश्वसनीय आहेत. सध्याची जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तक्रारदारांच्या दबावाखाली काम करीत आहे. त्यामुळे नव्या समितीसमोर सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आम्ही पुरावे देऊन म्हणणे मांडण्यासाठी मुदतीचा अर्ज दाखल केला असता तो फेटाळण्यात आला. मात्र पडताळणी समितीने तो फेटाळल्याने त्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहोत,” असं स्वामीजींचे वकील अॅड. संतोष न्हावकर यांनी अगोदरच म्हटलेलं आहे. त्यामुळे खासदारकीचा निर्णय न्यायालयातच होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 3:26 pm

Web Title: bjp solapur mp jay siddheshwar maharaj caste certificate cancel by caste verification committee bmh 90
Next Stories
1 पुणे : मौजमजा करण्यासाठी प्रोफेशनल डान्सरसह तिघांनी चोरल्या 25 दुचाकी
2 ‘ते’ मनसे कार्यकर्ते अडचणीत; पकडलेल्या नागरिकाने केली पोलिसांत तक्रार
3 ‘रेडीरेकनरचे दर कमी करण्यासाठी प्रयत्नशील’
Just Now!
X