राज्यात भाजपाचं लोटस किंवा आणखी कुठलंही ऑपरेशन यशस्वी होणार नाही, आम्ही सर्वजण एकत्र चांगलं काम करू. सत्ता न मिळाल्यामुळे विरोधकांची अवस्था ही पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी झाली आहे. हे त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे. असं विरोधकांनी सरकारवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना महाविकासआघाडी सरकारमधील महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. पुण्यात एका कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

तीन पक्षांच हे सरकार असल्यामुळे खातेवाटपासह थोडाफार उशीर होऊ शकतो, सर्व निर्णय हे विचारपुर्वक घ्यावे लागतात. मात्र, खातेवाटपाची यादी आज निश्चित जाहीर होईल, कदाचित आतापर्यंत ती झाली देखील असेल असं देखील थोरात यांनी यावेळी सांगितलं. तसेच, खाते वाटपाची यादी जाहीर करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री व राज्यपालांचा असल्याचेही ते म्हणाले.

जालना येथील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, मी त्यांच्या संपर्कात आहे, त्यांची नाराजी दूर होईल. आम्ही एकत्र काम करू. तर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनामा प्रकरणाबाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला.

…त्यामुळे चांगल्या नेतृत्वाला संधी देऊ शकलो नाही ही वस्तूस्थिती –
अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत थोरात म्हणाले की, मला असं वाटतं की इतरांना देखील थोडी संधी द्यावी, जिल्ह्यामध्ये आमचे आमदार व अन्य देखील चांगली लोकं आहेत. अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मी नाही घेतलं, तरी देखील मी पालक आहे. काळाच्या ओघात राजकारणाला थोडा वेग आलेला आहे. तीन पक्षांचं सरकार आहे, जागा मर्यादित आहेत. इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अनेक चांगल्या नेतृत्वाला संधी देऊ शकलो नाही ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे थोडी नाराजी ही होत असते, पण काही गोष्टी शेवटी समजून घेतल्या पाहिजते, असं माझं मत आहे. असेही थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.