News Flash

ज्ञानेश्वर पादुका चौकात ब्रेक निकामी झालेल्या पीएमपीने सिग्नलचा खांब तोडून दोघांना उडविले

ब्रेक निकामी झालेल्या पीएमपीच्या बसने ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये सिग्नलचा खांब तोडून दोन दुचाकीस्वारांना गंभीर जखमी केले. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

| August 30, 2014 03:30 am

ब्रेक निकामी झालेल्या पीएमपीच्या बसने ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये सिग्नलचा खांब तोडून दोन दुचाकीस्वारांना गंभीर जखमी केले. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
अश्विन दोशी (वय १९, मूळ रा. रविवार पेठ, सातारा) व सिद्धार्थ डुधू (वय १९, मूळ रा. सोलापूर) हे दोघे या घटनेत जखमी झाले आहेत. अश्विन हा एमआयटी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे, तर सिद्धार्थ हा मॉडर्न महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षांला आहे. बसचा चालक माणिक वाघमोडे याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
दुपारी दोनच्या सुमारास स्वारगेट- निलज्योती ही पीएमपीची बस वडारवाडीकडून ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये येत होती. त्या वेळी चौकात लाल सिग्नल होता. त्यामुळे काही वाहने सिग्नलला थांबली होती. बसचे ब्रेक न लागल्याने ही बस चौकाच्या अलीकडे असलेले सिग्नलच्या खांबावर आदळली. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या दुचाकीवर थांबलेल्या अश्विन व सिद्धार्थ यांनाही तिने उडविले.
सिग्नलच्या खांबाला धडकल्याने बस थांबली, पण सिद्धार्थ व अश्विन दुचाक्यांसह बसखाली अडकले. त्याचप्रमाणे खांबही बसखाली अडकून पडला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने बसकडे धाव घेतली. बसखाली अडकलेल्या दोघांना काढण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न सुरू केले. काही वेळांच्या प्रयत्नांनंतर एका बाजूने बस उचलून दोघांनाही बाहेर काढण्यात आले. त्यांना जखमा झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवानही दाखल झाले. बस मध्येच अडकून पडल्याने या भागात वाहतुकीची कोंडी झाली होती. बस बाजूला काढण्यासाठी त्याखाली अडकलेला सिग्लनचा खांब कटरच्या साहाय्याने कापून बाहेर काढावा लागला. त्यानंतर चौकातील वाहतूक सुरळीत होऊ शकली.
 
पीएमपी बसच्या नादुरुस्तीचा प्रश्न

नादुरुस्त पीएमपी बसचा प्रश्न अनेकदा निर्माण झाले आहेत. ब्रेक निकामी झालेल्या बसचे अपघातही सातत्याने होत असल्याचे दिसून येत आहे. ज्ञानेश्वर पादुका चौकातही ब्रेक निकामी झाल्यामुळेच अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बसचा ब्रेक लागला नसल्याचे चालकानेही सांगितले. शहराच्या गर्दीच्या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर बस धावत असताना त्या योग्य स्थितीत नसतील, तर नागरिकांसाठी त्या धोकादायक ठरू शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2014 3:30 am

Web Title: brake failed bus dashed signal pole
Next Stories
1 धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकावर बंदी आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम
2 लांडग्यावरील अभ्यासासाठी वन विभागासह स्वयंसेवी संस्था सरसावल्या
3 किमान दोनदा स्वच्छता व्हावी यासाठी आग्रही
Just Now!
X