News Flash

बीआरटी पुनर्रचनेचा ७५ कोटींचा खर्च वाया

एकात्मिक वाहतूक आराखडय़ाची अंमलबजावणी किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट झाले आहे.

कामाला समन्वयाचा फटका; एकात्मिक वाहतूक आराखडय़ाची अंमलबजावणी किती महत्त्वाची?

वाहतुकीसाठी सातारा रस्ता अपुरा ठरत असल्यामुळे आणि बीआरटी अंतर्गत सेवा रस्त्यांवर (सव्‍‌र्हिस रोड) अतिक्रमणे होत असल्यामुळे हा रस्ता रुंद करण्यासाठी तब्बल ७५ कोटी रुपये खर्च करून बीआरटी मार्गाची पुनर्रचना करण्यात येत असली तरी समन्वयाचा फटका या कामाला बसणार आहे. पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेचे कात्रजपर्यंत विस्तारीकरण करण्याच्या प्रक्रियेला वेग आल्यामुळे बीआरटी मार्ग पुनर्रचनेचा ७५ कोटी रुपयांचा खर्च वाया जाण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे एकात्मिक वाहतूक आराखडय़ाची अंमलबजावणी किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट झाले आहे.

स्वारगेट परिसरातील जेधे चौक ते कात्रज स्थानक या ६.२ किलोमीटर अंतरावर बीआरटी मार्गाचे काम सध्या वेगात सुरू आहे.  बीआरटी मार्गाबरोबरच सेवा रस्ता, पदपथ, सायकल ट्रॅक आणि अन्य वाहनांसाठी मार्गिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुणे स्ट्रीट प्रोग्रॅम प्रोजेक्ट अंतर्गत आयबीआय या कंपनीची नेमणूक त्यासाठी करण्यात आली होती. सध्या स्वारगेट चौक ते कात्रज चौक या सातारा बीआरटी मार्गाची पदपथ आणि सायकल ट्रॅकसह पुनर्बाधणी होणार आहे. सातारा रस्त्यावरील प्रायोगिक तत्त्वावरील बीआरटी मार्ग करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तब्बल १०० कोटींचा खर्च केला होता. पुनर्रचनेसाठी आता ७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र हा खर्च पाण्यात जाणार आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत पिंपरी ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेचे काम महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून वेगात सुरू आहे. मेट्रो प्रकल्पाच्या कामाचा वेग पाहिल्यानंतर मेट्रो मार्गिकांचे विस्तारीकरण व्हावे, अशी मागणी सुरू झाली. त्या अंतर्गत पिंपरी-स्वारगेट या मार्गाचा कात्रजपर्यंत विस्तार करण्यात यावा, अशी मागणी झाल्यामुळे महापालिकेनेही महामेट्रोला तसे पत्र दिले आणि सविस्तर प्रकल्प आराखडा करण्याची सूचना केली. त्यानुसार या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचा डीपीआर करण्याच्या हालचाली महामेट्रोकडून सुरू झाल्या आहे.

मेट्रो मार्गिकेला उड्डाणपुलांचा अडथळा

सातारा रस्त्यावर मेट्रो मार्गिकांचे विस्तारीकरण करण्यात उड्डाणपुलांचा अडथळा येत असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यामुळे मेट्रो मार्गिकांचे विस्तारीकरण करताना या उड्डाणपुलांचे काय करायचे, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. ही वस्तुस्थिती पाहता शासकीय यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव आणि एकात्मिक वाहतूक आराखडय़ाकडे होत असलेले दुर्लक्ष त्याला कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे.

बसथांबे मध्यभागी

स्वारगेट येथील जेधे चौक ते लक्ष्मीनारायण हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) असल्यामुळे तो वगळून ५.४ किलोमीटर बीआरटी मार्ग नव्याने आखण्यात येणार आहे. नगर रस्ता, आळंदी रस्ता बीआरटी मार्गाप्रमाणे बीआरटी बसथांबा हा मध्यभागात घेणार आहे. अस्तित्वातील काँक्रिट रस्ता तसाच ठेवून त्या लगतच्या रस्त्याचे नूतनीकरण करणार आहे. त्यासाठी सायकल ट्रॅक, पदपथ आणि सेवा रस्ते हटविण्यात येणार आहेत. बीआरटी मार्गिका सोडून प्रत्येकी तीन मार्गिका अन्य वाहनांसाठी उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत.

बीआरटीच्या धोरणाला हरताळ

पुणे-सातारा रस्त्यावर सन २००६-०७ मध्ये बीआरटीसाठी रस्ता विकसित करण्यात आला. बीआरटी मार्गाची निर्मिती करताना त्यासाठी शंभर कोटी रुपयांचा खर्च प्रशासनाने केला होता. बीआरटी सुरू झाल्यानंतर वाहतुकीसाठी रस्ता अपुरा पडत असल्याची जाणीव प्रशासनाला बारा वर्षांनंतर झाली होती. रस्त्याच्या पुनर्रचनेमुळे वाहतुकीसाठी अतिरिक्त एक मार्गिका उपलब्ध होणार असून पदपथ आणि सायकल ट्रॅक हटविण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येत असले तरी बीआरटीचा भाग असलेले सेवा रस्ते कमी केल्यामुळे बीआरटीच्या धोरणालाही हरताळ फासला गेल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 1:15 am

Web Title: brt reconstruction project
Next Stories
1 वीज बंद आणि उकाडय़ाने हैराण!
2 भरभराटीचे दिवस येण्याच्या प्रतीक्षेत पुस्तके!
3 युवकांनी साहित्य- संगीत कलांमध्ये रस घ्यावा
Just Now!
X