‘भावना तुमच्या.. शब्द आमचे’ असा एक छोटासा उपक्रम गेले तीन दिवस एका महाविद्यालयाने भरवलेल्या महोत्सवात करण्यात आला आणि या छोटय़ा उपक्रमाला लाभलेल्या यशातून हा उपक्रम सुरू करणाऱ्या तरुणाईला एका नव्या व्यवसायाची पायाभरणी करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातर्फे (गणेश खिंड) दरवर्षी महाविद्यालयातील युवक-युवतींच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना उद्योजकतेचे धडे मिळावेत यासाठी विविधा महोत्सव आयोजित केला जातो. युवक-युवतींनी स्वत: तयार केलेली अनेक प्रकारची उत्पादने, वस्तू, खाद्यपदार्थ आदी या महोत्सवात विक्रीसाठी ठेवले जातात. त्यासाठी प्रदर्शन भरवले जाते आणि स्टॉल्स लावले जातात. या महोत्सवाला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळतो. यंदाचा विविधा महोत्सव गुरुवारपासून शनिवापर्यंत भरवण्यात आला होता. कला शाखेच्या तिसऱ्या वर्षांत शिकत असलेल्या श्याम दाताळ, चेतन झडपे, शुभम कथले आणि शास्त्र शाखेच्या तिसऱ्या वर्षांत शिकत असलेल्या भाग्यश्री गायकवाड या चौघांनी मिळून या महोत्सवात लावलेला ‘भावना तुमच्या.. शब्द आमचे’ हा स्टॉल लक्षवेधी ठरला.

श्याम, चेतन आणि शुभम यांना साहित्याची आणि लेखनाची आवड आहे तर भाग्यश्री इंग्रजीतून उत्तम लिहू शकते. शुभम सुलेखनकारही आहे. त्यातूनच त्यांना हा स्टॉल लावण्याची कल्पना सुचली. कोणाला आपल्या मित्राविषयी, कोणाला शिक्षकांविषयी, कोणाला आई-वडिलांविषयी काही ना काही भावना शब्दांमधून व्यक्त कराव्या असे वाटत असते. मात्र त्यासाठी योग्य शब्द सुचत नाहीत. कोणाला आपल्या मित्रांच्या ग्रुपवर एखादी कविता वा एखादी चारोळी लिहावी असे वाटते. मात्र ते प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. त्यातून शब्द आमचे ही कल्पना या चौघांना सुचली आणि चौघांनी या कल्पनेवर आधारित महोत्सवात जो स्टॉल लावला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ज्या कोणाला काही मजकूर लिहून हवा असेल तो कविता, चारोळी, पत्र वा मुक्तछंद अशा प्रकारात श्याम, चेतन, शुभम आणि भाग्यश्री लिहून देत होते. ज्याला मजकूर हवा असेल त्याच्याकडून आधी कोणाविषयी मजकूर हवा आहे, त्यांच्याशी नाते काय वगैरे सविस्तर माहिती घेतली जायची. त्यानंतर प्रत्यक्ष मजकूर तयार करण्याचे काम सुरू व्हायचे. हा मजकूर एकदा तयार झाला की मग तो सुंदर अक्षरात भेटकार्डच्या स्वरुपात अगदी अल्प शुल्कात लिहून दिला जायचा. तो वाचून आणि पाहून आमच्या स्टॉलवर येणारा प्रत्येक जण खूश होत होता, असा अनुभव चेतनने सांगितला.

या आमच्या उपक्रमाचे कौतुक सर्वानी केलेच, शिवाय तुम्ही हे काम थांबवू नका. पुढेही असेच काही ना काही करत राहा, असेही सांगितले. आम्हाला काही ना काही मजकूर हवा असेल तेव्हाही आम्ही तुम्हाला सांगू असेही आम्हाला सांगितले गेले. महोत्सवात हा उपक्रम आम्ही हौसेने केला. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया व सूचना ऐकून व्यवसाय म्हणूनही आम्ही हे काम पुढे करू शकतो, हा विश्वास आम्हाला मिळाला, असे श्याम, चेतन, शुभम आणि भाग्यश्रीने सांगितले. ही सेवा ऑनलाईन देता येणे शक्य असल्यामुळे तसाही विचार करत आहोत, असे चेतन म्हणाला.