ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाही अशांना मतदान करू न देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असून मतदारांना या संबंधीचे मार्गदर्शन करण्यासाठी तसेच मतदार यादीतील नाव व छायाचित्र तपासण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघात मतदार यादी दुरुस्ती अभियान सुरू करण्यात येत आहे.
कोथरूडमधील प्रबोधन विचारधारा आणि स्थानिक आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी हे अभियान सुरू केले असून त्याची माहिती मोकाटे यांनी मंगळवारी दिली. ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नसेल अशा मतदारांना स्वत:च्या छायाचित्रासह निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठीचे मार्गदर्शन या अभियानात केले जाणार असल्याचे मोकाटे यांनी सांगितले. मतदार यादीतील छायाचित्राचा शोध, तसेच ते नसल्यास त्यासाठीचा अर्ज करणे वगैरे प्रक्रिया करण्यासाठी तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
कोथरूड विधानसभा मतदार संघ (क्र. २१०) निवडणूक कार्यालय, कर्वे रस्ता क्षेत्रीय कार्यालय, गरवारे महाविद्यालयाशेजारी, तसेच श्री छत्रपती संभाजी विद्यालय, कोथरूड गावठाण आणि सम्राट अशोक विद्यालय, कर्वेनगर मुख्य चौक, श्री भैरवनाथ मंदिराजवळ, कर्वेनगर या तीन ठिकाणी ही व्यवस्था असेल. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत या ठिकाणी जाऊन मतदारांना स्वत:चे नाव यादीत शोधता येईल, तसेच नावापुढे छायाचित्र नसेल, तर ते देण्यासाठीचा अर्जही याच ठिकाणी भरून देता येईल. हे अभियान ३० जूनपर्यंत चालणार आहे. ज्यांना अर्ज करावा लागणार आहे त्यांनी पॅनकार्ड, आधारकार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट यापैकी एक पुरावा आणि दोन रंगीत छायाचित्रं द्यायची आहेत.