21 October 2018

News Flash

नवोन्मेष : कॅरामेलास

ग्राहकांना उत्पादने माहिती झाल्यानंतर आपोआप प्रसिद्धी होत गेली आणि मागणी वाढायला लागली.

ठरावीक वेळेची आणि रोज तेच काम असणारी नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून राजेश कोतवाल यांनी आयएसआर फूड्सची स्थापना केली. केकचे दुकान चालविताना आलेल्या अनुभवातून आपणही हाच व्यवसाय करावा अशी इच्छा निर्माण झाल्यावर केवळ इच्छा व्यक्त करून न थांबता असंख्य अडचणींवर मात करत त्यांनी प्रसंगी स्वत:ची जमीन विकून भांडवल उभे केले. कॅरामेलासहा ब्रॅण्ड तयार करून त्या माध्यमातून केक, पेस्ट्रीबरोबरच डेझर्ट, बटर, खारी, क्रीमरोल अशी विविध उत्पादने विकण्यास सुरूवात केली. दर्जा आणि सेवेत कधीही तडजोड न केल्याने एका दुकानापासून तब्बल वीस दुकानांमधून आयएसआर फूड्च्या उत्पादनांची विक्री होत आहे.

राजेश कोतवाल यांनी इंद्रजित तुपे आणि संभाजी भोसले या सहकाऱ्यांबरोबर आयएसआर फूड्स नावाची फर्म वाघोलीजवळ केसनंद येथे २३ डिसेंबर २०१६ रोजी स्थापन केली. आयएसआर फूड्सच्या विविध उत्पादनांची ‘कॅरामेलास’ या ब्रॅण्डखाली विक्री केली जाते. केक, पेस्ट्रीबरोबरच डेझर्ट, खारी, टोस्ट, बटर क्रीमरोल, बर्गर अशी तब्बल ४३ उत्पादने आहेत.

राजेश यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आयटीआय) इलेक्ट्रिशिअनचा अभ्यासक्रम केला आहे. त्यानंतर घरातील परिस्थिती हलाखीची असल्याने यशवंत सहकारी साखर कारखान्यात त्यांनी दोन वर्षे नोकरी केली. मात्र, नोकरीमध्ये रस नव्हता. मुंबईत नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने ते गेले. दादरला फूल बाजारात काम केले. त्यानंतर पुन्हा पुण्यात आल्यानंतर चालक म्हणूनही काम केले. २०१३ मध्ये ते गंगाधाम येथील केकच्या दुकानात कामाला लागले. तेथे तीन वर्षे अनुभव घेतल्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला.

व्यवसाय सुरू केल्यानंतर असंख्य अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले. गंगाधाम येथील दुकानात काम करत असताना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा भांडवल उभे करण्याचे सर्वात मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. घरची हलाखीची परिस्थिती असताना स्वत:ची जमीन विकून त्यांनी व्यवसायाकरिता भांडवल उभे केले. हा ब्रँड नवीन असल्याने ग्राहकांना उत्पादने माहिती होईपर्यंत मागणी कमी आणि उत्पादन जास्त अशी परिस्थिती होती. त्यामुळे राजेश यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. ग्राहकांना उत्पादने माहिती झाल्यानंतर आपोआप प्रसिद्धी होत गेली आणि मागणी वाढायला लागली.

मागणी वाढल्यानंतर कॅरामेलास केक शॉप आणि कॅफे या ब्रॅण्डखाली उत्पादने विकण्यास त्यांनी सुरूवात केली आणि अल्पावधीतच खवय्यांनी आयएसआर फूड्स खाद्यपदार्थाना पसंती दिली. सद्य:स्थितीत पुणे आणि परिसरामध्ये आयएसआर फूड्सच्या कॅरामेलास ब्रॅण्डची वडगाव बुद्रुक येथील सिंहगड महाविद्यालय, कर्वेनगर, कोथरूड, लष्कर, हडपसर भागातील डीपी रस्ता, ससाणेनगर, भेकराई नगर, महादेव नगर, वडगाव शेरी, विश्रांतवाडी, वल्लभनगर पिंपरी, चिंचवड एम्पायर इस्टेट, चाकण, वाघोली, केसनंद, ऊरळी कांचन, लोणी, केडगाव अशा विविध भागात वीस दुकाने चालू आहेत.

राजेश, इंद्रजित आणि संभाजी हे तिघेही व्यवसायाचे काम पाहतात. कारखान्यात राजेश स्वत: सकाळी नऊ ते रात्री अकरावाजेपर्यंत कारखान्यात कार्यरत असतात. उत्तम सेवा, दिलेली वेळ सांभाळणे या बरोबरच उत्पादनांच्या दर्जाबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. कारखान्यात ७० कामगार काम करतात. सुरूवातीच्या काळात व्यवसाय नवीन असल्याने थोडी तारांबळ उडाली. कारखान्याच्या जवळ केसनंद येथील एकाच दुकानात उत्पादने विक्रीसाठी दिली जात होती. अनुभवातून बरेच काही शिकायला मिळाले. आयएसआर फूड्सची उत्पादने आता वीस दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवली जातात. तर, तब्बल ४५ व्यावसायिकांनी फ्रॅन्चायजीसाठी मागणी केली आहे. मात्र, ठिकाण, सेवा आणि दर्जा पाहून एका महिन्यात दोनच फ्रॅन्चायजी दिल्या जातात.

‘शहरातील अनेक भागात परराज्यातून पुण्यात केवळ व्यवसाय करण्यासाठी स्थायिक झालेली अनेक कुटुंबे आहेत आणि त्यांनी पुणेकरांची आवड-निवड समजावून घेऊन आपल्या व्यवसायाचा पाया घातला आहे. गंगाधाम परिसरात एका केकच्या दुकानात तीन वर्षे काम केले. या काळात लोकांची रूची जाणून घेता आली आणि खाद्यपदार्थाचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. व्यवसायाची आवड असल्याने आणि तीन वर्षे केकचे दुकान चालविल्याने आलेल्या अनुभवातून केक, पेस्ट्री आणि अन्य खाद्यपदार्थाचा व्यवसाय सुरू करण्याचे आव्हान पेलले. खाद्यपदार्थ्यांच्या व्यवसायाला चांगली मागणी आहे. केक, पेस्ट्री अशा खाद्यपदार्थाना वेळेचे बंधन आहे. वाढदिवसाला केकची मागणी आल्यास तो वेळेत पोहोचवणे आवश्यक असते. ग्राहकाला काय हवे आहे, ग्राहकाच्या आवडीनुसार तशी उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत किंवा कसे अशा अनेक गोष्टी तीन वर्षे केक व्यवसायात काम केल्यामुळे माहिती होत गेल्या. त्याचा फायदा झाला’, असे राजेश सांगतात.

आयएसआर फूड्सचे केकचे पंधरा प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये छोटे, मोठे केक, कुकीज, ड्राय आयटम्स आणि स्नॅक्स असे प्रकार केले आहेत. ब्लॅक फॉरेस्ट, रोज पेटल, रसमलाई, बटरस्कॉच, ब्लु-बेरी, चोको चिप्स, चोको ट्रफल, रेनबो असे विविध केकचे प्रकार आहेत. लहान मुलांच्या वाढदिवसाकरिता विविध प्रतिकृतींचे केक मागणीनुसार बनवून दिले जातात. व्यवसायाबरोबरच सामाजिक भानही राजेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जपले आहे. दरवर्षी २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन दिवशी ऊरळी कांचन आणि मांजरी येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना केक आणि स्नॅक्सचे वाटप करण्यात येते.

‘रसमलाई फ्लेवरमधील केक हे आयएसआर फूड्सचे विशेष उत्पादन आहे. आम्ही व्यवसाय सुरू करेपर्यंत हा केक पुण्यात कुठेही विक्रीकरिता नव्हता. पुण्यात जो व्यवसाय करेल तो जगात कुठेही व्यवसाय करू शकेल. कारण पुण्यातील खवय्ये कोणालाही डोक्यावर घेत नाहीत. त्यामुळे पुणेकरांनी व्यवसाय करण्यासाठी आत्मविश्वास दिला आहे’, असेही राजेश आवर्जून सांगतात. नव्या वर्षांत आणि आगामी काळात स्वत: तयार केलेले आइस्क्रीम विक्रीकरिता ठेवण्याचा मानस आहे. नाशिक, कोल्हापूर, मुंबई अशा विविध शहरांमध्येही विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे.

prathamesh.godbole@expressindia.com

First Published on January 12, 2018 4:05 am

Web Title: caramellas cake shop pune