मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शनिवार मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. हे पत्र समोर आल्यानंतर भाजपाने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत रविवारी राज्यभरामध्ये आंदोलनं केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यभर निदर्शने सुरू करण्यात आली आहेत. रविवारी पुण्यात देखील आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र आता या आंदोलनप्रकरणामध्ये करोना कालावधीतील नियम मोडल्याप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासहीत ४० ते ५० जणांविरोधात विश्रामबाग पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शनिवारी सायंकाळी परमबीर सिंग यांचं पत्र समोर आल्यानंतर रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलका चौकात पुणे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. करोना काळात एका ठिकाणी गर्दी होता कामा नये असा शासन आदेश असतानाही या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये चंद्रकात पाटील यांच्यासहीत ४० ते ५० जणांच्या नावांचा समावेश आहे.
महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात भाजपा तर्फे पुणे येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.’अनिल देशमुख हे सचिन वाझेंचा सभागृहात बचाव करत होते याच्या मागचं कारण म्हणजे वाझे त्यांच्यासाठी वसुली करत होते’असं प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil यांनी यावेळी स्पष्ट केलं.#ResignAnilDeshmukh pic.twitter.com/BHY5QaLHJW
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 21, 2021
मागितला होता मुख्यमंत्र्यांचा राजीनामा
या आंदोलनादरम्यान पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही राजीनाम्याची मागणी केली होती. आंदोलनाच्यावेळी माध्यमांशी बोलताना पाटील यांनी, “गृहमंत्री अनिल देशमुख हे जर राजीनामा देत नसतील तर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडले पाहिजे. हा विषय देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केल्यावर विधानसभा अनेक वेळा तहकूब झाली. यामुळे परमबीर सिंग यांच्या कालच्या पत्रामुळे वर्षभर असाच तमाशा चालू होता हे स्पष्ट झाले आहे. तसेच सभागृहात देखील सचिन वाझेला वाचविण्याचे काम अनिल देशमुख यांनी केले असून, या संपूर्ण प्रकरणी देशमुख हे देखील दोषीच आहेत. त्यामुळे त्याचा राजीनामा घ्यावा आणि त्यांची उच्च स्तरीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी पाटील यांनी केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 22, 2021 3:42 pm