केंद्रीय आरोग्य पथकाने गुरुवारी (३० एप्रिल) पुन्हा बारामतीला भेट दिली. बारामती प्रशासनाकडून करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती केंद्रीय पथकाकडून घेण्यात आली.

बारामती प्रशासनाने केलेल्या उपाययोजना चांगल्या पद्धतीने राबविण्यात आल्या आहेत, तसेच प्रशासनाचे नियोजन चांगले असल्याचे मत केंद्रीय आरोग्य पथकाचे प्रमुख डॉ. ए. के. गडपाले यांनी नोंदविले. पथकात डॉ. सागर बोरकर, डॉ. अंशू गुप्ता, डॉ.व्ही.एस. रंधवा यांचा समावेश होता. केंद्रीय आरोग्य पथकाने चार दिवसांपूर्वी बारामतीस भेट दिली होती. त्यानंतर अचानक केंद्रीय पथकाने भेट दिल्याने धावपळ उडाली. बारामती प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना यापुढील काळात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.या पथकाने देसाई इस्टेट भागाची पाहणी केली तसेच तेथील स्वयंसेवकांबरोबर चर्चा केली. बारामती पॅटर्ननुसार नागारिकांना भाजीपाला, किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचविल्या जात आहेत, याचे कौतुक केंद्रीय पथकाने केले.त्यानंतर बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात पथकाने भेट देऊन तेथील कामकाजाची पुन्हा माहिती घेतली.

प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी  मनोज खोमणे, नगरपरिषद मुख्याधिकारी योगेश कडूसकर, गटाविकास अधिकारी राहुल काळभोर आदी या वेळी उपस्थित होते.