सध्या शहरांचे नावे बदलण्याचे वारे देशभरात सुरु आहे. नुकताच उत्तर प्रदेशमधील अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज तर फैजाबादचे अयोध्या असे करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर पुण्याचे नाव जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. त्याचबरोबर सरकारने औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करावे असेही संघटनेने म्हटले आहे. पुणे हे शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी वसवले असल्यामुळे त्यांचेच नाव या शहराला द्यावे असे ब्रिगेडच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने नामांतराच्या मागणीचे निवेदन आज पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, राज्यातील औरंगाबादचे संभाजी नगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि पुण्याचे जिजापूर असे नामांतर सरकारने करावे. त्यामुळे सध्याच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास समजण्यास आधिक मदत होईल. पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि पुण्यात जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला आहे. त्यामुळे भाजप सरकारने त्वरीत पुण्याचे नाव जिजापूर करावे.

याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही ही मागणी करण्यात येणार आहे.