‘क्विकर’ या संकेतस्थळावर सॉफ्टवेअर कंपनीची जाहिरात देऊन एका संगणक अभियंत्याला नोकरीच्या आमिषाने सव्वा लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार येरवडा येथील आयटीपार्क येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रणधीरकुमार मंडल (वय २४, रा. वाकड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडल हा एका कंपनीत संगणक अभियंता म्हणून नोकरीस आहे. तो आणखी चांगल्या नोकरीच्या शोधात होता. त्याने आपला बायोडाटा विविध ठिकाणी पाठविला होता. तसेच, तो विविध संकेतस्थळांवर नोकरीच्या जाहिराती पाहत होता. ‘क्विकर’ या संकेतस्थळावर त्याने नेव्ही एंटरप्रायजेस डेव्हलपर्स नावाची सॉफ्टवेअर कंपनीची जाहिरात पाहिली. ही कंपनी आयटी पार्क येरवडा येथे असून त्यांना जावा डेव्हलपर्स म्हणून काही संगणक अभियंत्यांची आवश्यकता असल्याचे जाहिरातीमध्ये म्हटले होते. त्यानुसार, मंडल याने कंपनीशी संपर्क साधला. त्याला नोकरीचे आश्वासन मिळाले. पण, त्यासाठी सुरक्षा रक्कम म्हणून एक लाख दहा हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार त्याने सुरक्षा रक्कम कंपनीकडे भरली. कंपनीने त्याला एक महिना प्रशिक्षण म्हणून काम करायला लावले. हे प्रशिक्षण येरवडा परिसरात घेण्यात आले होते. या प्रशिक्षण काळात काम करूनही त्याला पगार देण्यात आला नाही. त्याने मागणी केल्यावर पगार देण्याचे आश्वासन दिले.
कंपनीत काम केल्याचा पगार न मिळाल्यामुळे त्याने कंपनीशी संबंधित असलेल्याचे सांगणाऱ्या लोकांकडे तक्रार केली. मात्र, त्याने कंपनीबाबत अधिक माहिती काढल्यानंतर येरवडा आयटी पार्क परिसरात अशी कंपनीच नसल्याचे आढळून आले. त्यामुळे मंडल याने या लोकांकडे सुरक्षा ठेव म्हणून घेतलेले एक लाख दहा हजार रुपये आणि वर्षांचा पगार देण्याची मागणी केली. पण, त्याचा पगार व सुरक्षा ठेव न देता फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पंकज चौधरी, ओंकार मोती, राहुल गुप्ता या तीन व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरराव अधिक तपास करीत आहेत. येरवडा पोलिसांनी अशाच पद्धतीचा एक गुन्हा उघडकीस आणला आहे. त्या गुन्ह्य़ातील आरोपींनीच हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांना या गुन्ह्य़ात शनिवारी वर्ग केले जाणार आहे.