पुण्यातील व्यापाऱ्याला ग्राहकांच्या नावाने खोटे ई मेल पाठवून चीन येथील एका बँकेत पैसे भरण्यास सांगितले. व्यापाऱ्याने तब्बल ४६ लाख रुपये त्या बँक खात्यावर भरले. मात्र, माल खरेदी केल्याचे पैसे न मिळाल्याचे समजताच त्यांना फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी तत्काळ पुणे सायबर शाखेकडे तक्रार केली. सायबर विभागाने तत्परतेने त्या बँकेला खाते बंद करून हा प्रकार कळविला. त्या बँकेने भरलेले पैसे चीन येथील कंपनीला परत दिले.
पुण्यातील व्यापारी हेमंतदास भागचंदानी (रा. वानवडी) हे गेली वीस वर्षे चिली देशात राहात होते. त्या ठिकाणी टेक्सटाईल व्यवसायाचे एजंट म्हणून काम करत होते. ते काही वर्षांपूर्वी पुण्यात आले असून येथून व्यापार करतात. त्यांचा सर्व व्यापाराचा व्यवहार ई मेलवरून चालतो. त्यांनी चीन येथील कंपनीकडून माल खरेदी करून चिली येथील व्यापाऱ्यांना पाठविला. चिलीतील व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन ते चीनच्या व्यापाऱ्यांना द्यायचे होते. दरम्यान चीन येथून माल खरेदी केलेल्या कंपनीच्या ई मेल आयडी सारखा दिसणारा ई मेल आरोपींनी तयार केला. भागचंदानी यांना त्यावरून ई-मेल करून खाते बदलल्याचे सांगून मालाचे पैसे चीन येथील एका बँकेत भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ४६ लाख रुपये भरले. पण, त्या कंपनीला पैसे मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. भागचंदानी यांनी तत्काळ सायबर शाखेकडे तक्रार केली. सायबर विभागाने तत्परतेने त्या बँकेला खाते बंद करून हा प्रकार कळविला. बँकेने हा प्रकार लक्षात घेऊन ४६ लाख रुपये त्या कंपनीला परत दिले.
‘आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना दक्षता घ्या’
आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधामध्ये ई मेलची महत्त्वाची भूमिका असून अनेकांना खरे-खोटे ई मेल ओळखता येत नाहीत. खऱ्या ई मेलमध्ये थोडा बदल केलेले ई मेल वापरून व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचे गुन्हे घडत आहेत. आंतरराष्ट्रीय व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी याबाबत दक्षता घ्यावी. शक्यतो डिजीटल सिग्नेचरचा वापर करावा, असे अवाहन सायबर शाखेकडून करण्यात आले आहे.