बारावीची परीक्षा राज्यभरात सुरळीत सुरू झाली असली, तरी उत्तरपत्रिका तपासण्याचा प्रश्न मात्र चिघळण्याची चिन्हे आहेत. परीक्षेच्या पहिल्या दिवशी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बारावी परीक्षेच्या मुख्य नियामकांची बैठक होऊ दिली नाही. शासन निर्णय निघत नाही, तो पर्यंत उत्तरपत्रिकांच्या तपासण्याबाबत कोणतेही काम होऊ देणार नसल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. मात्र, सगळ्या विषयांच्या बैठका झाल्या असल्याचे राज्यमंडळाचे म्हणणे आहे.
राज्यात बारावीची परीक्षा गुरूवारपासून सुरू झाली. वैकल्पिक भाषा विषयाची परीक्षा गुरूवारी होती. एकूण १० विषयांच्या परीक्षा सकाळ आणि दुपारच्या सत्रात होत्या. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर शासनाने काही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संघटनेने बहिष्कार मागे घेतला होता. मात्र, आता गेल्यावर्षीप्रमाणेच उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी घेतला आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून मुख्य नियामकांची बैठक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी होऊ दिलेली नाही.
सकाळी परीक्षा सुरू झाल्यानंतर मराठीच्या मुख्य नियामकांची बैठक होती. राज्यातील नऊ विभागांमधील मुख्य नियामक या बैठकीसाठी पुण्यात आले आहेत. मात्र, त्या वेळी शिक्षकांनी मुख्य नियामकांना बैठक कक्षामध्ये जाऊ दिले नाही, असे राज्यमंडळातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामावर बहिष्कार टाकण्याबाबत संघटनेची भूमिका मुख्य नियामकांना कळवण्यात आली होती. मात्र, कामाचा भाग म्हणून मुख्य नियामक बैठकीच्या ठिकाणी आले होते. मात्र, त्यांना संघटनेच्या भूमिकेबाबत पत्र देऊन त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. उर्दू विषय वगळता बाकी कोणत्याही विषयाच्या बैठका झाल्या नाहीत, असे शिक्षकांनी सांगितले.
 
‘‘मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार शासननिर्णय येत नाही, तोपर्यंत उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे एकही काम केले जाणार नाही. नियामकांच्या बैठकाही होणार नाहीत. मात्र, प्रत्यक्ष परीक्षेमध्ये अडथळा आणला जाणार नाही.’’
– अनिल देशमुख, सचिव, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना

‘‘सर्व विषयांच्या बैठका सुरळीत झाल्या. मराठी विषयासाठी फक्त मुख्य नियामकांची उपस्थिती कमी होती. मात्र, बाकीच्या सर्व विषयांच्या बैठकांना काहीही अडचण आली नाही. यापुढील बैठकाही नियोजित वेळापत्रकानुसार होतील.’’
– गंगाधर मम्हाणे, अध्यक्ष, राज्यमंडळ

पहिल्याच पेपरला ४२ कॉपीबहाद्दर
मराठी, गुजराती, उर्दू, कन्नड, सिंधी, बंगाली, मल्याळम, तामिळ, तेलुगू, पंजाबी, फ्रेंच, पाली या दहा विषयांची परीक्षा होती. पहिल्याच दिवशी राज्यात गैरमार्गाचे ४२ प्रकार उघडकीस आले आहेत.