पुणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून आणखी पुढील काही तास असाच पाऊस राहणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, गरज असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केले आहे.

शहराच्या सद्य परिस्थितीबाबत लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीने पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक यांच्याशी संवाद साधून अधिक माहिती जाणुन घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, पुणे शहर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरू असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन, अग्नीशामक विभाग सज्ज आहे. पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेता शहरात एनडीआरएफची एक टीम दाखल झाली आहे. आतापर्यंत हजार कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यश आले आहे. या बाधित कुटुंबांना प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे शहरात आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू आहे. या संततधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार धरणात झपाट्याने वाढ झाली असून खडकवासला धरणातून ४५ हजार ४२४ क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्याने नदी पात्रालगत असलेल्या पाटील इस्टेट, मंगळवार पेठ, विश्रांतवाडी शांतीनगर वसाहतीमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या असून यातील जवळपास एक हजार बाधित कुटुंबांना अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शाळा, समाज मंदिर अशा सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. शहराला जोडणार्‍या अनेक पुलांवरील वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे.