एकीकडे बंगालच्या उपसागरातील मान्सूनची शाखा पुढे सरकत असताना अरबी समुद्रातील शाखेची प्रगती मात्र वातावरणीय स्थितीमुळे मंदावल्याचे दिसून येत आहे. ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’च्या (आयएमडी) अहवालानुसार रविवारीही या शाखेच्या प्रगतीबाबत तूर्त अनुकूल स्थिती नसल्याचेच चित्र आहे. या कारणांमुळे मान्सूनचे राज्यातील आगमन आठ दिवसांनी लांबण्याची शक्यता काही हवामानतज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
‘आयएमडी’ने रविवारी रात्री वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील २ ते ३ दिवसांत मध्य व उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग, ईशान्येकडील राज्ये व उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल स्थिती आहे. यंदा मान्सूनचे केरळमध्ये झालेले आगमन लांबले होते. त्यानंतर अरबी समुद्रातील मान्सूनच्या शाखेने मार्गक्रमण केले, परंतु कर्नाटकच्या काही भागात पोहोचल्यानंतर ही शाखा मंदावली. ‘पावसासाठी गरजेचे असलेले कमी दाबाचे क्षेत्रही या ठिकाणी तयार झाले नसून पुढच्या चार ते पाच दिवसांत ते निर्माण होण्याची शक्यता दिसत नाही. बाष्पयुक्त ढगांचे प्रमाणही कमी असल्यामुळे आठवडाभर राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. शिवाय जूनमध्ये पावसाचे प्रमाण कमीच राहू शकेल,’ असे एका हवामानतज्ज्ञांनी सांगितले. ‘आयएमडी’च्या राज्यासाठीच्या अंदाजानुसार १३ ते १५ जून या कालावधीत कोकण व गोव्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याबरोबर सोमवारी व मंगळवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि केवळ सोमवारी मराठवाडय़ात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.