राज्यातील कमी दाबाचे क्षेत्र दूर होताच मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ातील बहुतांश भागांत आणि विदर्भात सर्वच ठिकाणी किमान तापमानात घट झाली असल्याने पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. पुढील तीन ते चार दिवस तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तरेकडील जवळपास सर्वच राज्यांमध्ये गेल्या आठवडय़ात थंडीची तीव्र लाट आली होती. तेथून महाराष्ट्राच्या दिशेने थंड वाऱ्यांचे प्रवाहही येत होते. मात्र, राज्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्याचबरोबरीने दक्षिणेकडून उष्ण वाऱ्यांचे प्रवाह येत होते. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील किमान तापमानात फार मोठी घट होऊ शकली नाही. केवळ विदर्भात दोन दिवस कडाक्याची थंडी अवतरली होती. दोन दिवसांपूर्वी पुन्हा तापमानात वाढ झाली असताना कमी दाबाचे पट्टे आणि उष्ण वाऱ्यांचे प्रवाह दूर होऊन राज्याच्या अनेक भागांत तापमानात घट झाली. सध्या उत्तरेकडील राज्यांत पावसाळी स्थिती आहे. दोन दिवसांनंतर या भागांत पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात तापमानातील घट कायम राहू शकेल.

हवाभान..

मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, सोलापूर, सातारा या भागांतील किमान तापमान सरासरीखाली आल्याने गारवा निर्माण झाला आहे. कोकणात अलिबागचे तापमान सरासरीखाली आहे. मराठवाडय़ातील परभणीचा पारा घसरला असून, औरंगाबादमध्येही हलकी थंडी अवतरली आहे, विदर्भात सर्वच ठिकाणी रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली असल्याने या ठिकाणी चांगलीच थंडी जाणवते आहे. बुधवारी गोंदिया येथे राज्यातील नीचांकी १०.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.