महापालिकेच्या मिळकत कर विभागाने गेल्या सहा महिन्यात ६०० कोटी रुपयांचा मिळकत कर गोळा केला केला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत १४३ कोटी रुपयांनी अधिक रक्कम जमा झाली आहे. थकबाकीदारांच्या मिळकतीसमोर बँडवादनाची मोहीम सुरू केल्यामुळे थकित मिळकत कर मोठय़ा प्रमाणावर गोळा होत आहे.
मिळकत कर विभागाचे प्रमुख, उपायुक्त हेमंत निकम यांनी शनिवारी ही माहिती दिली. मिळकत कर विभागाने थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली असून थकबाकीदारांना नोटिसा पाठवण्याबरोबरच इतर कायदेशीर प्रक्रियाही केल्या जात आहेत. वसुलीसाठी मोठय़ा थकबाकीदारांच्या मिळकतीसमोर बँडवादन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येकी तीन वादकांची दहा पथके तयार करण्यात आली असून त्यांच्याबरोबर जाऊन संबंधित अधिकारी व कर्मचारी थकबाकीची वसुली करतात. त्यामुळे चांगली वसुली होत आहे.
गेल्या सहा महिन्यात सहाशे कोटी रुपयांचा कर वसूल झाल्याचे निकम यांनी सांगितले. गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर २०१२ अखेर ४५७ कोटी रुपये इतका मिळकत कर गोळा झाला होता. यंदा तो ६०० कोटींवर गेला आहे. रोजच्या वसुली मोहिमेसाठीचे वेळापत्रकही तयार करण्यात आले असून रोज पाच विभागीय निरीक्षकांच्या कार्यक्षेत्रात मोहीम राबवली जात आहे.