एसटी प्रशासनाने पूर्वी काढलेल्या वेगवेगळ्या परिपत्रकातील तरतुदींचा भंग करून कामगारांना मिळणाऱ्या आर्थिक लाभापासून वंचित ठेवले आहे. एसटीच्या गाडय़ांसोबत आवश्यक टूल व टायर न देता काही ठिकाणी खराब गाडय़ा घेऊन जाण्याची सक्ती केली जाते, असा आरोप एसटी कामगार संघटनेकडून करण्यात आला आहे.
कामगारांना येणाऱ्या विविध अडणींबाबत व प्रलंबित आर्थिक लाभाबाबत संघटनेचे सरचटिणीस हनुमंत ताटे यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. शासनाने महामंडळाला देय असलेली २०११ कोटींची रक्कम रोखीने द्यावी. त्यातून कामगारांना करारातील थकबाकी व अन्य देय रक्कम लवकर मिळण्यास मदत होईल. कामगार कायद्याच्या तरतुदीप्रमाणे राज्य शासनाने जाहीर केलेला जानेवारी २०१३ पासूनचा आठ टक्के महागाई भत्ता लागू केला नसल्याने कामगार कायद्याचा भंग झाला आहे. त्यामुळे तत्काळ हा महागाई भत्ता थकबाकीसह लागू करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
द्विपक्षीय वाटाघाटीत मान्य केलेल्या निर्णयांची अंमलबजावणीही वेळेवर केली जात नाही. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना नियमांचा भंग केला जातो. काही ठिकाणी खराब गाडय़ा घेऊन जाण्याची सक्ती केली जाते. बदल्या, बढत्यांचे संकेत व नियमही डावलले जातात. प्रवासी जनतेला दर्जेदार सेवा देण्यात निर्माण होत असलेले अडथळे वेळेवर दूर केले जात नाहीत. त्यामुळे प्रवासी उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होत आहे, असे आरोपही संघटनेने केले आहेत. या परिस्थितीबाबत न्याय मिळाला नाही, तर व्यापक संघर्ष केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.