काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी सकाळपासूनच चिंता व्यक्त केली जात असताना राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी राजीव सातव यांच्या प्रकृतीविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. “राजीव सातव यांच्यावर करोना आजाराचे उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे”, अशी माहिती विश्वजीत कदम यांनी दिली. राजीव सातव यांना जहांगीर रुग्णालयात दाखल केल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवर चर्चा करून सातव यांच्यावरील उपचारांची माहिती घेतली.

सध्या राजीव सातव व्हेंटिलेटरवर

यावेळी विश्वजीत कदम म्हणाले की, “राजीव सातव यांना १९ एप्रिलला करोना आजाराची लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांनी २१ एप्रिलला तपासणी केल्यावर, त्यांना करोना आजार झाल्याचे २२ एप्रिलला आलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले. या आजारावर उपचार घेण्यासाठी ते पुण्यातील जहांगीर रूग्णालयात २३ एप्रिलला दाखल झाले. त्यांची प्रकृती २३ ते २५ तारखेच्या दरम्यान उत्तम होती. पण त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना तात्काळ आयसीयूमध्ये उपचारांसाठी दाखल केले गेले. तेथून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेमडेसिवीर आणि अन्य इंजेक्शन देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, त्याच दरम्यान त्यांची प्रकृती अजून बिघडल्याने कालपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे”.

“जिथे असाल, तिथूनच प्रार्थना करा”

“राजीव सातव यांच्या प्रकृती बाबत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते लक्ष देऊन आहेत. सतत फोनच्या माध्यमातून प्रकृतीची विचारपूस करीत आहेत. तसेच राजीव सातव हे उपचारांना प्रतिसाद देत असून मला विश्वास आहे की, राजीव सातव हे करोना आजारावर मात करतील. पुन्हा जनतेच्या सेवेकरीता दाखल होतील. राजीव सातव यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात कोणीही भेटण्यास येऊ नये, आपण जिथे कुठे असाल तिथून देवाकडे प्रार्थना करा”, असे आवाहन विश्वजीत कदम यांनी केले.

राजीव सातव यांची प्रकृती खालावली; राहुल गांधींची पुण्यातील डॉक्टरांशी चर्चा

राजीव सातव यांना मुंबईमधील एका रुग्णालयात दाखल केले जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर विश्वजीत कदम म्हणाले की, “काल दुपारपर्यंत त्यांची प्रकृती पाहून आम्ही चर्चा केली. पण पुन्हा डॉक्टर, कुटुंबीय आणि इतरांचा सल्ला घेतला गेला. तेव्हा राजीव सातव यांची प्रकृती स्थिर झाल्यावर जर गरज पडली तर मुंबईला दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल”, असे त्यांनी सांगितले.